✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.2 मे) :- जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीतून कॉंग्रेस-भाजपा मधील अंतर्गत छुपी युती उघड झाली असून, जनतेशी बेईमानी करणारे हे पक्ष शेतक -याना काय न्याय देतील ? असा प्रश्न आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे यांनी केला आहे.
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत विद्यमान पालकमंत्री भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि माजी पालकमंत्री कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे आपल्या समर्थका मार्फत अनैसर्गीक युती घडवून पक्षांतर्गत राजकारणात शेतक-याचा बळी घेतल्याचा आरोप सुनील देवराव मुसळे यांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्हयात कॉंग्रेस आणि भाजपा हे पारंपारिक पक्ष आहेत. प्रत्येक निवडणूकीत हे दोनही पक्ष एकमेकांचे विरोधात उमेदवार उभे करतात आणि भाषणात एकमेकाच्या पक्षाचे विरोधात बोलतात. त्यांचा विरोध हा केवळ दिखावू विरोध असून, प्रत्यक्षात दोनही पक्षाची अंतर्गत सेटिंग असल्यांची आजवर खुली चर्चा होती.
आता मात्र चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमीत्ताने दोनही पक्षाची छुपी युती आता उघड झाली आहे. कॉंग्रेस असेल कि भाजपा असेल, दोनही पक्षापैकी कोणीही सत्तेवर आले तरी, ते शेतक-याना न्याय देण्याऐवजी केवळ आपला गल्ला भरण्यांचेच काम करतील असा आरोपही मुसळे यांनी केला आहे. या ढोंगी संधीसाधू लोकांपासून जनतेनी सावध रहावे असे आवाहन प्रेस नोट च्या माध्यमातून आम आदमी पार्टी ने केले आहे.
