वरोरा येथे सरपंच, शेतकरी, शेतमजुर यांची बैठक संपन्न 

207

🔹अतीवृष्टीमुळे नुकसानीची अत्यल्प भरपाई व वरोरा शहरातील कोळसा वाहतूक या समस्येविरोधात जनहित याचिकेचा मसुदा अंतिम 

🔸प्रसिध्द विधीज्ञ पुरुषोत्तम सातपुते व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांची उपस्थिती

 ✒️मनोज कसारे (भद्रावती प्रतिनिधी)

भद्रावती(दि.5 फेब्रुवारी) :- मागील वर्षी आलेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थिती मुळे झालेले नुकसान, त्यावर राज्य शासनाचा अत्यल्प मोबदला व वरोरा शहरात सुरू असलेली कोळसा वाहतूक, त्यातून शहरवासीयांना होत असलेला त्रास या विषयांवर स्थानिक साई मंगल कार्यालय येथे वरोरा-भद्रावती तालुक्यातील सरपंच, शेतकरी, शेतमजुर, यांची सहविचार बैठक आज (दि. ५) ला संपन्न झाली. 

या बैठकीत जिल्ह्यातील प्रसिध्द विधीज्ञ पुरुषोत्तम सातपुते व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, वरोरा शिवसेना तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांची उपस्थिती प्रामुख्याने होती. सुरवातीला शेतकऱ्यांचे कैवारी स्व. मोरेश्वरराव टेमुर्डे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली.

मागील वर्षी २०२२ मधे वरोरा-भद्रावती तालुक्यात अतिवृष्टी झाली. अनेक गावात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या अतिवृष्टीचा शेतकरी, शेतमजुर, व ग्रामीण जनतेला मोठा फटका बसला. अनेकांचे नुकसान झाले. काही विशिष्ट भागात तर प्रमाणाहून अधिक नुकसान झाले. ही अतिवृष्टी जरी नैसर्गिक होती, मात्र तरी ज्या भागात वेस्टर्न कोल्टफिल्डस (WCL) आहेत, त्या भागात वेकोलीच्या चुकिच्या धोरणाने व नियोजनाने पुर परिस्थिती निर्माण झाली होती.

वेकोलीच्या ढिगाऱ्यामुळे नदीपात्रातील पाणी गावात शिरले होते. यात शेतीचे, पिकाचे, व घरांचे मोठे नुकसान झाले. याची नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकार कडुन शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रु. मदत दिल्या गेली. ही मदत अपुरी आहे. शेतकरी पिक कर्ज एकरीच्या हिशोबाने घेतात. पीककर्ज हे पिकनिहाय असते. मात्र नुकसान भरपाई ही हेक्टरी व सरसकट होती. त्यात एकरी नुकसान व पिकनिहाय नुकसान बघितल्या गेले नाही. त्यामुळे नुकसानीच्या प्रमाणात मदत तोकडी ठरली.

या विरोधात यापूर्वी राज्य शासनाकडे दाद मागण्यात आली होती. अनेक पत्र, निवेदन देण्यात आले होते. तसेच शेतकरी, शेतमजूर यांच्या अनेक बैठका घेतल्या गेल्या. गावागावातून शासनाला जिल्हाधिकारी मार्फत नुकसान भरपाई साठी ठराव पाठविण्यात आले. परंतु राज्य सरकारने उदासिनता दाखवून नुकसानीच्या प्रमाणात भरपाई वर्ग केली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर येथे जनहित याचिका दाखल करण्याच्या दुष्टीने रिठ याचीकेचा मसुदा तयार करण्यात आला. या मसुदयाचे वाचन करून आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.

सदर मसुदा जेष्ठ विधीतज्ञ ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांचे मार्गदर्शनात शेतकरी बांधवांना विश्वासात घेवून तयार करण्यात आला. तसेच वरोरा शहरातून होणारी कोळसा वाहतुक या समस्येविरोधात देखील रिठ याचिका तयार करण्यात आली. व सर्वांच्या उपस्थितीत मसुदा वाचून अंतिम करण्यात आला. 

लवकरच या दोन्ही जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात येणार आहे.सोबतच शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून होत असलेला त्रास व वेकीली मुळे होणारा त्रास याबाबत देखील जनहित याचिकेचा मसुदा बनविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी वरोरा व भद्रावती तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“शेवटी धनोजे कुणबी समाज मंदीर, लक्ष्मीनगर, चंद्रपुर तर्फे दि. १०,११ व १२ फेब्रुवारीला कृषी महोत्सव -२०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन एड. पुरुषोत्तम सातपुते यांनी केले.”