टेमुर्डे साहेबांचे अपूर्ण स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे : शिंदे

239

🔹चोरा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळा अनावरण व पुण्यस्मरण सोहळा संपन्न

✒️मनोज कसारे (भद्रावती प्रतिनिधी)

भद्रावती (दि.28 जानेवारी) :- टेमुर्डे साहेब हे एक तत्ववादी व्यक्तिमत्व व स्पष्टवक्ता राजकारणी होते. शेतकरी, वंचित, शेतमजूर, गरीब यांच्या समस्येची त्यांना जाण होती. चोरा या गावातील काही ग्रामस्थ साहेबांना भेटायला गेले व गावात युवकांमध्ये वाढलेली व्यसनाधीनता व गावातील समस्या साहेबांसमोर कथन केल्या.

हा सर्व प्रकार लक्षात घेऊन साहेबांनी मला बोलावून हि परिस्थिती सांगितली व या गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून सांगितलेले विचार हेच या गावातील नवं पिढीला वाचवू शकते, त्यामुळे गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतळा बसवावा, असा गावकऱ्यांचा मानस असून तू त्यांना संस्थेच्या माध्यमातून मदत करावी अशी सूचना केली.

आज साहेबांनी मला दिलेला आदेश आणि मी साहेबांना दिलेला शब्द पूर्ण केला. या कार्यक्रमाचे साहेब नियोजित अध्यक्ष होते. खरं तर साहेबांच्या उपस्थितीत हा पुतळा अनावरण सोहळा व्हायला पाहिजे होता पण नियतीला ते मान्य नव्हते. साहेबांनी या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या विकासाचे अनेक स्वप्न पाहीले होते.

अनेकदा त्यांनी बोलूनही दाखविले चुकीच्या माणसांना साथ देऊन चूक केल्याची खंतहि त्यांनी व्यक्त केली. साहेब हे निष्कलंक व्यक्तिमत्व होते. साहेबांनी या मतदार संघासाठी पाहिलेले स्वप्न सामाजिक आणि राजकीय मार्गाने आपण पूर्ण करू असे म्हणत मी सदैव आपल्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही देतो, असे रवि शिंदे म्हणाले.

तालुक्यातील चोरा येथे २७ जानेवारी व २८ जानेवारीला विदेही सद्गुरू श्री. संत जगन्नाथ महाराज जनजागृती अभियान अंतर्गत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर व श्री. गुरुदेव सेवा मंडळ, चोरा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. योगी अनंत महाराज मठ चोरा येथे दोन दिवशीय श्री. योगी अनंत महाराज प्रगटदिन व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५४ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त आज (दि.२७) ला पहिल्या दिवशी गावातून भव्य मिरवणूक काढून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. 

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंट वरोरा या संस्थेचे सचिव अमन टेमुर्डे हे होते तर उदघाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते ॲड. पुरुषोत्तम सातपुते, प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख तथा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष रवींद्र शिंदे, ग्रामपंचायत चोरा येथील सरपंच संगीत खिरटकर, माजी जिल्हापरिषद सभापती तुळशीराम श्रीरामे, जयंत टेमुर्डे, माजी जिल्हापरिषद सदस्य मारोती गायकवाड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजने, शिवसेना वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती पंचायत समितीच्या माजी सभापती विद्या सतीश कांबळे, माजी नगरसेविका सुषमाताई शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य महेश टोंगे, बंडू नन्नावरे, प्रशांत डाखरे, भोलापाटील टोंगे, मंगेश भोयर, परसराम जांभुळे, इंदुताई नन्नावरे, संदीप उईके, आदी मान्यवर उपस्थित होते. 

सकाळी ११ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यशवंतराव शिंदे विद्यालयाच्या विद्यार्थींनी स्वागत गीत गायन करून अतिथींचे स्वागत केले. त्यानंतर ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्पात उदघाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष स्व. मोरेश्वरराव टेमुर्डे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहून करण्यात आली. 

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन नंदोरी ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश भोयर यांनी केले तर आभार गुरुदेव सेवा मंडळाचे बाळा पडवे यांनी मानले. त्यांनतर हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. 

रवी हा माझा मानस पुत्र : ॲड. पुरुषोत्त्तम सातपुते

शिंदे परिवाराचे आणि माझे फार जुने ऋणानुबंध आहेत. स्व. श्रीनिवास शिंदे यांनीं दाखविलेल्या विश्वासामुळे आज मी वकिली क्षेत्रात एवढी प्रगती करू शकलो आहे. टेमुर्डे साहेब गेल्याने समाजाची मोठी हानी झालेली आहे.टेमुर्डे साहेब हे रवीचे मार्गदर्शक होते. त्यांना सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्राचा मोठा अनुभव होता.

मी त्यांचा एवढा अनुभवी जरी नसलो तरी मी रवी शिंदे यांच्या सैदव पाठीशी उभा राहील. अनेक जण मला म्हणतात सातपुते वकील हे रवी बोलाविले कि प्रत्येक कार्यक्रमात हजर असतात. हो हे सत्य आहे कारण रवीकडे कुठलेही मोठे पद नसतांना कि शासनाची मदत न घेता त्याने चालविलेले संस्थेचे कार्य हे अभिमानस्पद आहे. रवी हा माझा मानस पुत्र असून रवी ने मला आवाज द्यावा मी त्याचा सोबत आहो असे मत ॲड. सातपुते यांनी व्यक्त केले. 

सोबतच ॲड. पुरुषोत्त्तम सातपुते यांनी धनोजे कुणबी समाज मंदिर, चंद्रपूर तर्फे शेतकरी बांधवांकरीता दिनांक १०,११ व १२ फेब्रुवारी ला भव्य कृषी महोत्सव-२०२३ हे चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे आयोजित आहे, या महोत्सवाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.