राजुऱ्यात गोंडपिपरी वरून रेतीची तस्करी 

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.31 डिसेंबर) :- गोंडपीपरी तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याची जोरात चर्चा आहे.आज घडीला रेतीचा कृत्रिम तुटवडा असल्याचा कांगावा करून हायवा २८ ते ३० हजारात विकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. …राजुरा तालुक्यात खांबाडा घाट वगळता एकाही नाल्याचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे रेती तस्करांना रेतीचा उपसा करण्याची आयती संधी मिळाली आहे.

सध्याविहिरगाव,मूर्ती,विरुर,चिचबोडी,टेम्बुरवाही,सिर्सी, देवाडा,सिध्देश्वर,सोंडो,राजुरा, कापणगाव, गोवरी,सुमठाणा सह नदी पट्टयातील नाल्यातून रेतीची चोरटी वाहतूक जोमात सुरू आहे.सध्या यातील बहुतेक नाले कोरडे पडले आहे. मात्र शहरातील मोठया हायवा,ट्रक रेती तस्करांनी गोंडपीपरी कडे मोर्चा वळवला आहे.या तालुक्यातील नदी घाटातून मशनरी च्या साहाय्याने रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत असल्याची माहिती आहे. या तस्करांच्या गाड्या पहाटे येत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्टॉक च्या नावाखाली बिनदिक्कतपणे उत्खनन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या रेतीचा परवाना नाही तरी सुध्दा वाहतूक सर्रासपणे होत असल्याने या तस्करांना कुणाचे अभय मिळत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. आज घडीला हायवा तीस हजारात विकण्यात येत आहे. तस्करांना खुली सूट मिळत असल्याने त्यांची रेती चोरी सुसाट सुरू आहे. या चोरट्या वाहतूकीमुळे शासनाला लाखोंच्या महसुलावर पाणी फेरावे लागत आहे.या गंभीर प्रकाराकडे महसूल व पोलीस विभाग लक्ष देतील काय असा प्रश्न विचारला जात आहे.