✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.28 ऑगस्ट) :-महागाव तालुक्यातील माळकिन्ही ते माळेगाव या मार्गावरील येथील शिप नदीवरील अर्धवट अवस्थेतील पुलामुळे या मार्गावरील अनेक खेडी असल्याने विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसात नदीला आलेला पुरामुळे मोठा फटका बसत आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून या पुलाच्या बांधकामाचे भिजत घोंगडे आहे.
गुरुवारी 28 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शिप नदीला अक्षरशा प्रचंड पूर आला होता. या भागातील विद्यार्थी सवना, गुंज या ठिकाणाहून शिक्षणासाठी या मार्गावरून मार्गक्रम करीत असतात. गुरुवारी आलेल्या प्रचंड पुरामुळे विद्यार्थ्यांना आपल्या गावाकडे पलीकडील तीरावर शाळेचे 30 विद्यार्थी अडकले होते. विद्यार्थ्यांना क्रुझर गाडीमध्ये बसून कासोळा मार्गे माळेगाव येथे नेऊन सोडण्याची व्यवस्था गुंज येथील मंडळअधिकारी संदीप मानकर व ग्राम महसुल अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यवस्था केली होती. अशा महत्त्वाच्या सात आठ खेड्यांच्या रहदारी मार्गावरील या पुलाचे अर्धवट काम मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी माळेगाव येथील सेवालाल मंदिर संस्थान मध्ये सदर पुलाच्या निर्मितीसाठी वाढीव निधी देऊन काम मार्गी लावण्याचे यावेळी ग्रामस्थांना आश्वासन दिले होते. प्रशासनाने या गंभीर कामाची दखल घेत तातडीने काम चालू करून पूर्णत्वास न्यावे आणि या भागातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी या परिसरातील जनतेची एकमुखी मागणी आहे.







