माळकिन्ही येथे सख्या भावानेच केला भावाचा खून

🔸मुगाच्या शेंगा तोडण्याच्या कारणावरून घडला धक्कादायक थरार ; आरोपी अटकेत

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.26 ऑगस्ट) :- मानवी नात्यांना काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना महागाव तालुक्यातील माळकिन्ही शेत शिवारात 26 ऑगस्ट रोजी घडली. शेतातील किरकोळ वादातून माळकिन्ही येथील एका भावाने सख्या भावाचाच खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  प्राप्त माहितीनुसार, माळकिनी येथील प्रदीप अशोक रिंगे (वय ३०) हा आपल्या शेतात काम करीत असतांना त्याचा मोठा भाऊ निलेश अशोक रिंगे (वय ३५) याच्याशी शेतातील मुगाच्या शेंगा तोडण्याच्या कारणावरून वाद झाला. वाद चिघळताच प्रदीपने मानसिक तणावातून बांबूची काठी उचलून आपल्या सख्या भावांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जबर तडाखे दिले. या गंभीर मारहाणीमुळे निलेश रक्तबंभाळ होऊन अतिशय वेदना झाल्याने त्याचा जागेवरच कोसळुन मृत्यू झाल्याची घटना घडली. सख्ख्या भावाने आपल्या भावाचा शेतात खून केल्याची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी प्रदीप रिंगे याला ताब्यात घेण्यात आले आहे. मयत निलेश रिंगे याचे शव उत्तरीय तपासणीसाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास चालू आहे.

गावात शोककळा

एका भावाने सख्या भावाचाच खून केल्याच्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृतकाच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि तीन वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे. नात्यांतील प्रेम व आपुलकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.