आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या यवतमाळ जिल्ह्यात चक्क 11 लाखांची दहीहंडी

🔹हैरान शेतकऱ्यांच्या उरावर नृत्यांगनेचा नाच कितपत योग्य? देवा भाऊंनी दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे

✒️विश्वनाथ महामुने यवतमाळ(Yavtmal प्रतिनिधि)

21 ऑगस्ट रोजी उमरखेड येथे होणाऱ्या दहीहंडी मध्ये मराठी नटी सुप्रसिद्ध लावणी कलाकारांच्या कार्यक्रमात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात दहीहंडी फोडल्या जाणार ही दहीहंडी लाख दोन लाख नाहीतर 11 लाखाची आहे. परंतु अकरा हजार रुपये मागील पंधरा वर्षात भाजपाच्या कार्यकाळात एकही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शिस्तीच्या पक्षाकडून दिल्या गेले नाहीत, हा विषय सद्या मतदार संघात चर्चीला जात आहे.

मागील वर्षी दहीहंडी कार्यक्रमांमध्ये महागाव तालुक्यातील एका युवकाला चेंगराचेंगरीत अपंगत्व स्वीकारावे लागले.याही वर्षी म्हणजेच 21ऑगस्ट 2025 रोजी उमरखेड येथे विद्यमान आमदारांच्या पक्षाकडून दहीहंडीचा कार्यक्रम आयोजीत केला. सदर कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कॅबिनेट मंत्री संजय राठोड सह पक्षातील कार्यकर्ते, राज्याच्या सत्तेतील सरकार मधील आमदार खासदार तथा मंत्र्यांची उपस्थीती या जिल्ह्यासाठी आकर्षण ठरली आहे. या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्यांनी थैमान घातले आहे. वीज पडून शेतकरी, शेतमजूर तथा पाळीव प्राण्यांचे शेकडोंच्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न होऊ घातलेल्या लावणी कार्यक्रमाच्या निमित्ताने होत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलल्या जात आहे.

  महागाव तालुक्यातील वेणी धरण या ठिकाणी अनेक जनावरे धरणामध्ये वीजपडून मृत्यूमुखी पडलेत. परंतु या बाबीकडे सत्तेतील पक्षाचे शेतकऱ्यांचे मंत्री असलेले महसूलमंत्री यांनी या कडे विशेष दुर्लक्ष केले. खरे तर उमरखेड- महागाव विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्या आहेत. या समस्यांकडे विद्यमान आमदार सत्तेतील नेते म्हणून मिरवणारे “भाऊं” नी कोणतेही लक्ष दिले नाही.

काहीच दिवसा आधी निसर्गाचा प्रकोप होऊन वादळी वाऱ्याच्या तडाख्यात केळीच्या बागा नेस्तनाबूत झाल्या, या प्रसंगी विभागाचे आमदारांचा पाहणी दौऱ्या दरम्यान सवना येथील शेतकऱ्यांच्या केळी बागेची पाहणी करतांना आमदाराला एका शेतकऱ्याने ‘आमदार साहेब सध्या आपल्याकडून शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळेल काय?’ असे उद्गारले असता आमदार महोदयांनी रागाने डरकाळी फोडली. काही वेळ त्या ठिकाणी या प्रसंगाने शांतता पसरली होती. शेतकरी नेत्याकडे आपली कैफियत मांडतात परंतु ज्या शेतकरी, शेतमजुरांनी ज्यांना निवडून दिले तेच त्यांच्यावर रागावतात असे अनेक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर या अगोदर प्रसारित झाले आहे.

खरे तर या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महसूल मंत्र्यांनी यावे ही रास्त अपेक्षा. या मतदार संघातील शेतकऱ्यांची शेतमजुरांची समस्या सोडविण्यासाठी येणे अपेक्षित होते. परंतु महसूलमंत्री दहीहंडीच्या कार्यक्रमाला येणार असल्याचे पॉम्पलेट नुकतेच सत्तेतील पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर प्रकाशित करण्यात आले आहे. त्या मध्ये महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांची फोटो हँडबील मध्ये आहे. तसेच शेजारील आमदार, खासदार सुद्धा या कार्यक्रमाला आपली उपस्थीती लावणार असल्याचे सध्या सोशल मीडियावर फिरून शेतकऱ्यांच्या मोबाईलच्या हाती जात आहेत.

कधीकाळी या मतदारसंघांमध्ये शेतकरी सुजलाम सुफलाम होता, परंतु महसूल मंत्री उमरखेडच्या दहीहंडीला उपस्थित राहणार हा जनतेमध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे.ज्या शेतकऱ्यांच्या छातीवर मुंग दळून गौतमीचा नाच होणार आहे, त्या नाचामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जात आहे.या जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघांमधील आदिवासी विकास कॅबिनेट मंत्री प्रा.अशोक उईके यांची उपस्थीती सुद्धा राहणार आहे. तथा सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या समक्ष अनेक खासदार आणि आमदार या मतदारसंघात गौतमीच्या छम छम छम कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे बॅनर विद्यमान आमदाराच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रकाशित केले आहे.

विधानसभेमधील पोलीस विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग, वनविभागासह अनेक खात्यामध्ये त्या त्या कार्यालयातील प्रमुखांना याबाबत विचारले असता, आम्ही खूप काही केले, या दहीहंडीसाठी आर्थिक नियोजन परंतु आम्ही समोर येऊन सांगू शकत नाही, अशी खंत माध्यमातून जवळ व्यक्त होत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात दहीहंडी आणि गौतमींचे नृत्य हा विषय सामान्य शेतकरी, शेतमजूरांना काही पचनी पडणारा नसला , तरीही या वर आमचे काही चालत नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी, शेतमजुराकडून खुलेआम बोलल्या जात आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कैवारी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमरखेड विधानसभेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या मतदारसंघांमध्ये त्यांच्या सत्तेतील पक्षाचे आमदार आहे, त्याच मतदारसंघांमध्ये एखादी मराठी नटी आणून शेतकऱ्यांचे उरावर नाचविले जात असेल तर देवा भाऊंची या विधानसभेमध्ये काय किंमत राहील, हा विषय शेतकरी शेतमजूर जनतेमध्ये चर्चिल्या जात आहे.

माध्यमांच्या प्रतिनिधी द्वारे आमदार किशनराव वानखेडे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, माझं काय गरीब माणसाचे? हा कार्यक्रम ‘भाऊंनी’ त्यांचे कार्यकर्त्यांसाठी ठेवला. गौतमी पाटीलांच्या बहारदार नृत्यामध्ये होणाऱ्या दहीहंडीसी माझा काहीही संबंध नाही अशी प्रतिक्रिया दिली.