✒️विश्वनाथ महामुने पुसद(विभागीय प्रतिनिधी)
पुसद(दि.13 ऑगस्ट) :-
श्री. ज्ञानेश्वर संस्थान पुसद येथे संत ज्ञानेश्वर माऊली वेशभूषा सोबत गीता पठण स्पर्धा, गोकुळाष्टमी निमित्त राधाकृष्ण वेशभूषा व नृत्य स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा तसेच मातीची गणेशमूर्ती बनविण्याच्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीला उजाळा देण्यासाठी खालील कार्यक्रमांचे आयोजन विदर्भाची पंढरी पुसद येथील श्री. ज्ञानेश्वर संस्थान द्वारा करण्यात आले. वारकरी संप्रदायाचे आद्यप्रवर्तक संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांचे सप्तशतकत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष म्हणजेच 750 वा जन्मोत्सव आहे. ज्ञानोबारायांच्या 750 व्या जयंती महोत्सवात तसेच श्रीकृष्ण जन्मानिमित्त गोकुळाष्टमी शुक्रवार दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाणार आहे.
या शुभ दिनाचे औचित्य साधून पुसद मधील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वेशभूषा स्पर्धे सोबत गीतापठण यामध्ये भगवद्गीतेचा बारावा किंवा पंधराव्या अध्यायातील एका श्लोकाचे सादरीकरण या बाबतची भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा दुपारी 12 वाजता संस्थांमध्ये होणार आहे. तसेच कृष्ण जन्मा निमित्त गोकुळाष्टमीला 15 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता राधाकृष्ण वेशभूषा आणि राधाकृष्ण नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन संस्थांन मधील कै. बापूराव चिद्दरवार स्मृती सभागृहामध्ये दुपारी 2 वा. आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पुसद शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक वृंद या स्पर्धेमध्ये आमंत्रित आहेत. या स्पर्धेसाठी ‘अ’ गट इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी मधील विद्यार्थी आणि ‘ब’ गट इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी मधील विद्यार्थी भाग घेणार आहेत.
आणि सायंकाळी 7.30 ते 9 या वेळेमध्ये लहान मुलांचा वयोगट एक ते पाच वर्षे वयाचा ‘अ’ गट आणि वय सहा ते दहा वर्ष ‘ब’ गट अशा पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे .
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रत्येक गटामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेता काढण्यात येईल. प्रत्येक विजेत्या विद्यार्थ्याला सन्मानचिन्ह आणि त्याच्या शाळेला सुद्धा सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
15,16 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 11.30 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण आयोजीत करण्यात आले आहे. 16 ऑगस्ट शनिवार रोजी संस्थान द्वारा पुसद नगरी मधून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या मध्ये ज्ञानेश्वर माऊलीची झाकी आणि तुकाराम महाराजांची झकी आणि विठुरायांची झाकी तसेच भजनी मंडळ आणि भाविकांचा शोभायात्रेमध्ये प्रचंड सहभाग राहणार आहे. ही शोभायात्रा 16 ऑगस्टला सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेमध्ये आपल्या पुसद शहरामधून निघणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाची ज्योत तेवत राहण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्याने रविवार दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा विनामूल्य आयोजित केली आहे. ही स्पर्धा दुपारी ठीक 12 वाजता संस्थान मधील कै. बापुराव चिद्दरवार स्मृती सभागृहामध्ये आयोजीत केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना चालना मिळावी, तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूरक प्लास्टर ऑफ परिसच्या गणेशमूर्ती मुळे होणारे नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी मातीची सर्वांना ओळख व्हावी, या वेळी आपल्या मुलांनी बनविलेल्या मातीच्या श्री. गणेशाची मूर्तीची स्थापना येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये आपल्या घरी करून निसर्गाला सुद्धा त्याची मदत व्हावी. या हेतूने मातीची श्री. गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा रविवारी दि. 24 ऑगस्ट 2025 ला सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेमध्ये संस्थांमध्ये आयोजित केलेली आहे.
तरी भाविकांनी या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे आव्हान श्री. ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष बिपिन जिद्दवार यांनी केले आहे.







