अपात्र झालेल्या सरपंच्यांच्या स्वाक्षरीने आर्थिक कामकाज करु नये ; गटविकास अधिकारी

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी) 

महागाव(दि.12 ऑगस्ट) :- 

4 ऑगस्ट 2025 रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये राहुर ग्रामपंचायतच्या सरपंच्या यांच्यावर अपात्रतेच्या कार्यवाहीचे आदेश धडकले. त्या मुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती महागाव यांनी अपात्र झालेल्या सरपंच्या यांच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायत व्यवहार कदापी करू नये, अशा आशयाच्या पत्राद्वारे 7 ऑगस्ट 2025 रोजी सुचीत केले आहे. 

     या बाबत सविस्तर वृत्त असे की, राहुर ग्रामपंचायतच्या सरपंच्या राजनंदनी शिवाजी काचेवाड यांच्या कार्यकाळात गावातील विकास कामात करण्यात आलेल्या कामाच्या मोबदल्याच्या धनादेशावर स्वाक्षऱ्या न केल्याने आणि गावातील विकास कामाबद्दल सरपंच्याचे उदासीन धोरणामुळे दोन तक्रारकर्त्यांनी तक्रार दाखल केल्या होत्या. सरपंचांनी पदाचा दुरुपयोग करीत प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत पदाधिकारी असतांना स्वतःच्या कुटुंबीयांसाठी शासनाची दिशाभूल करीत पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता उचल केला असल्याचे सचिवांनी दिलेल्या अहवालात नमूद केले होते. त्या मुळे सदर प्रकरण त्यांच्या अंगलट आले.

अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी ग्रामपंचायत विवाद मामला क्र./ 14/(1) (ग) 2024 द्वारे 4 ऑगस्ट 2025 रोजी अपात्रतेच्या कार्यवाहीचे आदेश काढले आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत राहुर प्रशासनाला विजय खिल्लारे गटविकास अधिकारी पंचायत समिती महागाव यांनी 7 ऑगस्ट 2025 रोजी एका पत्राद्वारे सूचित केले. या पुढे अपात्र ठरलेल्या सरपंच्या राजनंदनी शिवाजी काचेवाड यांच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायत राहुर येथील कोणतेही कामकाज तथा आर्थिक व्यवहार अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या दिनांकापासून पुढील आदेशा पर्यंत करण्यात येऊ नये, असे सूचित केले आहे. संबंधित सरपंच्यानी आयुक्तांकडे अपील केलेले असल्यास त्या प्रमाणे कार्यवाही करावी.

अपील दाखल केल्याची पावती आपणाकडे प्राप्त झाल्यास त्या प्रमाणे कार्यवाही करावी.अन्यथा वरील सरपंच्याचे स्वाक्षरीने ग्रामपंचायत राहुर येथील कोणताही आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचे आढळून आल्यास आपणावर कार्यवाही केली जाईल, या बाबत ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत राहुर यांना गट विकास अधिकाऱ्यांनी आदेशित केले आहे.