🔸21 लाख 65 हजारांची रक्कम आणि सोन्याचा ऐवज लंपास करण्यात चोरटे यशस्वी
✒️विश्वनाथ महामुने महागांव(Mahagaon प्रतिनिधी)
महागाव(दि.8 ऑगस्ट) :-
फुलसांगवी येथील प्रसिद्ध भांड्याचे व्यापारी ज्ञानेश्वर गणपत बोंढारकर यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी हातसाफ करत 21 लाख 65 हजारांची रोकड आणि सोन्याचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारच्या रात्री अकरा वाजता उघड झाली. गुरुवारी बोंढारकर यांनी महागाव पोलीस स्टेशनला तशा आशयाची तक्रार दाखल केली.
फुलसांगवी हे मार्केट महागाव तालुक्यात नावारूपाला आलेली बाजारपेठ आहे. येथील व्यवसायिक ज्ञानेश्वर गणपत बोंढारकर यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी घरी कोणीही नसल्याचे हेरून हातसाफ करत तब्बल 21 लाख 65 हजाराची रोख रक्कम आणि सोन्याचा ऐवज लंपास केला. ज्ञानेश्वर बोंढारकर हे आपल्या कुटुंबीयांसह 31 जुलै रोजी राजस्थानातील खाटू श्याम बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. सहकार्यासोबत धार्मिक प्रवास आटोपून बुधवारी रात्री अकरा वाजता घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. घरात प्रवेश केल्यानंतर संपूर्ण घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले होते.
तत्काळ घराची तपासणी केल्यानंतर पलंगाखाली ठेवलेले रोकड व एक ग्राम सोन्याचा ऐवज चोरीस गेला असल्याचे त्यांच्या निदर्शनातआले. ही घटना उघड होतात परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पुसद शाखेचे चौरे, महागावचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे, सहायक पोलीस निरीक्षक सरस्वती राठोड, पीएसआय अमोल राठोड तसेच ठसेतज्ञ मुंडाले आणि पोलीस कर्मचारी गजानन येडतकर, गजानन खरात व गजानन मस्के यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
चोरट्यांचा त्वरित छडा लावण्याच्या उद्देशाने यवतमाळ येथून स्वान पथकास पाचारण करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा बारकाईने तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेऊन त्वरितअटक करण्याचे आव्हान पोलीस दलासमोर आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलीस यंत्रणेकडून तपास प्रक्रिया आहे.







