महागाव येथील स्व. वसंतराव नाईक तैलचित्रा जवळ होऊ घातलेल्या देशी दारू दुकानाला प्रखर विरोध

🔸राज्यमंत्री इंद्रनील नाईकांची घेतली शिष्टमंडळांनी भेट

✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon प्रतिनिधी)

महागाव(दि .4 ऑगस्ट) :- नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 1मध्ये देशीदारू दुकान सुरू करण्यासाठी प्रभारी मुख्याधिकारी यांनी ‘नाहरकत प्रमाणपत्र’ दिले होते. देशी दारूच्या त्या प्रमाणपत्राच्या विरुद्ध नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक पेटून उठल्यामुळे अखेर प्रशासनाला ते ‘नाहरकत प्रमाणपत्र’ रद्द करावे लागले. देशी दारूचे दुकान नाकारण्यात बंजारा समाजाचा सिंहाचा वाटा आहे. 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक साहेबांच्या तैलचित्रा जवळच हे देशीदारूचे दुकान देण्याचा प्रकार महागाव न.प. मुख्याधिकारी महेश जामनेर यांनी केला होता. ते दुकान या ठिकाणी कदापिही होऊ नये, म्हणून शनिवारी 2 ऑगस्ट रोजी पुसद येथील नाईक बंगल्यावर शिष्टमंडळांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट घेऊन समाज बांधवांनी व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी व्यथा मांडली. 

   राज्यमंत्री महोदयांनी तात्काळ महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शुभम जयस्वाल यांना देशी दारूचे दुकान देण्याबाबत असलेले प्रकरण नाकारण्या बाबतचे आदेश दिले. उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक तसेच यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांना सुद्धा दूरध्वनी द्वारे संपर्क साधून त्यांना निर्देशित केले. या वेळी बंजारा समाजाच्या भावना दुखावण्याचा हा प्रकार असून हा झालेला प्रकार निंदनीय आहे. हा प्रकार कुठल्याही परिस्थितीत थांबलाच पाहिजे. या करिता राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुढाकार घेतलेला आहे .

इंद्रनील नाईक यांना भेटण्यासाठी महागाव तालुका जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष ज्येष्ठनेते संभाजीराव नरवाडे, महागाव नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे, शैलेश कोपरकर, महागाव पंचायत समितीचे माजी सभापती कॉम्रेड एड. डी.बी. नाईक, महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दीपक आडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दौलतराव नाईक, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रा. शिवाजीराव राठोड, महागाव येथील डॉ. पंजाबराव राठोड यांच्या नेतृत्वात बंजारा समाज बांधवांत आत्माराम राठोड, बाबूलाल राठोड, यांच्या सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक व समाज बांधव या वेळी पुसद येथे उपस्थित होते.