पाचोंदा तीर्थक्षेत्राचा माहूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करून विकास व्हावा

🔸बहुसंख्येत रामभक्तांची मागणी

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)

महागाव(दि.1 ऑगस्ट) :- सर्व देवी देवतांचे माहेरघर असलेल्या माहूर या आदिवासी व नक्षल प्रवण भागातील तालुक्यातील पाचोंदा हे पुरातन तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्राचा रामायणात सुद्धा उल्लेख आहे. या तीर्थक्षेत्राचा म्हणावा तसा गाजावाजा न होऊ शकल्याने त्रेतायुगात पांचाळेश्वर हे नाव असलेले हे तीर्थक्षेत्र विकासापासून कोसो दूर आहे. माहूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणात या तीर्थक्षेत्राचा समावेश करून विकास केल्यास निसर्गरम्य वनराईने नटलेला हा परिसर तीर्थक्षेत्रा बरोबरच पर्यटनस्थळ म्हणून सुद्धा नावारूपास येऊ शकतो.या भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन हा भाग जगाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकेल.

  पूर्वी या तीर्थक्षेत्रावर माहूर येथील प्रसिद्ध दत्तशिखर मंदिरात येणारे भाविक सुद्धा मोठ्या प्रमाणात ये-जा करत असत, मात्र या श्रीराम संस्थानचा म्हणावा तसा विकास झाला नसल्यामुळे हे तीर्थक्षेत्र दुर्लक्षित राहिले. या भागात ये-जा करण्यासाठी फारसी दळणवळणाची सोय नसल्याने इकडे भाविकांची ये-जा कमी झाली. येथील तीर्थक्षेत्र हे उनकेश्वर ता.किनवट येथील शाखेची उपशाखा असून प्रभू श्री. रामचंद्र माहूर येथील अनसूया मातेच्या दर्शनाला आले असता ते पाचोंदा या तीर्थक्षेत्रावर सुद्धा आलेले असल्याचा इतिहास आहे. या क्षेत्राचे नांव पांचाळेश्वर हे होते. तेव्हापासून या तीर्थक्षेत्रावर प्रभू श्री. रामाचे मंदिर आहे. जाणकार लोकांना अजूनही या तीर्थक्षेत्राचे महत्व माहित आहे, ते भाविक आजसुद्धा माहूर गडावर आल्यानंतर पाचोंदा येथे येतात. आजतागायत या भागातील काही दूरदृष्टी असणाऱ्या विकासप्रेमी नागरिकांनी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र कुणीही म्हणावी तशी दखल घेतली नसल्याने हा भाग विकासापासून कोसो दूर आहे.

     माहूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत विकास आराखड्यात समावेश असलेले वझरा (शेख फरीद) या गावापासून हे क्षेत्र केवळ 10 कि.मी अंतरावर आहे. येथे एक प्राचीन तलाव असून त्या तलावातील कमळाची फुले आजही श्री. दत्तप्रभू, अनसूयामाता, रेणुकामातेच्या पूजेसाठी आणल्या जातात. हे तीर्थक्षेत्र निसर्गरम्य वनराईने नटलेले असून या तलावाचा विकास झाल्यास इको टुरिझम येथे यशस्वी होऊ शकते. या भागात पर्यटकांना मनमुराद पर्यटनाचा आस्वाद घेता येऊ शकतो. त्यामुळे या भागातील गोरगरीब, दिन दलित,आदिवासी, भटक्या विमुक्त जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. आदिवासी, नक्षलप्रवण भागातील बेरोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. पौराणिक दृष्ट्या महत्वाचे असलेला हा दुर्लक्षित ठेवा तिर्थक्षेत्र विकासाच्या वाटेवर आल्यास या तीर्थक्षेत्राला गतवैभव प्राप्त होण्यास मदत होईल. 

    या करिता आयोध्या येथील राम मंदिर प्रश्नाच्या धर्तीवर “तुज आहे तुजपाशी परी जागा भुललासी” हा राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचा अभंग लक्षात घेऊन पाचोंदा येथील श्री. राम मंदिरास शासनाच्या ज्या तीर्थक्षेत्र विकासाच्या व अन्य योजना आहेत.या तीर्थक्षेत्राचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करून येथील प्राचीन तलावाचा विकास करून पाचोंदा तीर्थक्षेत्राचा विकास केल्यास या भागात पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. प्रशासनाने या पुरातन तीर्थक्षेत्राच्या विकासाकडे लक्ष दयावे, अशी अपेक्षा बहुसंख्य रामभक्त व्यक्त करीत आहेत. 

“पाचोंदा तीर्थक्षेत्राचा माहूर विकास प्राधिकरणात समावेश करण्याबाबत लोकप्रतिनिधी लक्ष देणे गरजेचे आहे.या तीर्थक्षेत्राचा माहूर विकास प्राधिकरणात समावेश करून या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकासाला चालना देण्यास प्रयत्न झाल्यास परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पाचोंदा हे क्षेत्र अतिदुर्गम जंगल भागात असल्याने वनविभागा मार्फत सुद्धा काही योजनामधून विकास करता येईल.प्रशासनाने दखल घेत वनविभागाच्या विविध विकास योजनेतून निधी उपलब्ध करून दयावा”.

 काशीराम नामा‌ पवार (पाटील) अध्यक्ष, श्रीराम संस्थान, पाचोंदा