कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान तर्फे लेडी गव्हर्नर डॉ.कमलताई गवई यांचा सत्कार संपन्न

✒️अमरावती (Amravati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

अमरावती (दि.15 जुलै) :- लेडी गव्हर्नर डॉ.कमलताई गवई यांच्या विचारात सकारात्मकता आणि आत्मविश्वासात उदंडता आहे. रात्रंदिवस कार्यमग्न असणाऱ्या ताईंचे जीवन त्यांनी समाजसेवेसाठी अर्पण केले आहे.त्या थोर समाजसेविका आहेत.त्या आनंदाने जगतात आनंदी राहतात आणि सतत आनंद वाटत राहतात.त्यांनी दादासाहेबांना पूर्ण साथ देऊन मुलांवर सुसंस्कार करून मुलांना घडविले आणि भारताच्या सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचविले. मंगल मैत्रीचा प्रचार आणि प्रसार करून त्या सर्वांना मंगल मैत्री शिकवितात. आज ८३ व्या वर्षी सुद्धा त्यांचे हे समाजकार्य सतत सुरूच आहे.असे विचार साहित्यिक प्रा. अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.

           ते दि.१३जुलै २०२५ ला लेडी गव्हर्नर डॉ.कमलताई गवई यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त ताईच्या गृहालयी कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावती तर्फे संपन्न झालेल्या सत्कार समारंभाप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांनी व्यक्त केले.

      लेडी गव्हर्नर डॉ.कमलताई गवई यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी शाल,पुष्पगुच्छ व स्वरचित “निखारा” काव्यसंग्रह भेट देऊन सत्कार केला व अभिष्टचिंतन केले आणि मातोश्री कमलताई गवई यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणाऱ्या ” मातोश्री कमलताई गवई ” या स्वरचित अभंगाचे गायन करून अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि मातोश्री कमलताई गवई यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वावर विचार व्यक्त केले.

            याप्रसंगी मा.अशोकराव गजभिये (रिटायर टाउन प्लॅनिंग ऑफिसर ), प्रा.जगदीश गोवर्धन, मा.उद्धव भालचक्र, प्रा.रजत वाघमारे, समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड, डी. जे.खडसे (जिल्हाध्यक्ष पिरीपा, यवतमाळ), निर्मल सरदार (उपाध्यक्ष, रिपाई ), अनिलभाऊ वानखडे, दीपक डांगे, मा.रमेशभाऊ वानखडे, ॲड. राजेश तायडे, मा. त्र्यंबकभाऊ ढोके, डॉ. धनराज चक्रे यांच्या सोबतच ताईंच्या शेकडो चाहत्यांची मातोश्री कमलताई गवई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यासाठी उपस्थिती होती.

       प्रत्येकाने केलेल्या मातोश्री कमलताई गवई यांच्या सत्काराची सांगता ताईंनी नियोजन केलेल्या स्वरुची भोजनाने झाली.