हे नातं फक्त मतांचं नाही, माणुसकीचं आहे

✒️वर्धा(Wardha विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 

वर्धा(दि.9 एप्रिल) :- 

आपल्या मतदारसंघातील जनतेशी आमदाराचं नातं कसं असावं हे शिकायचं असेल, तर ते सुधीर भाऊ मुनगंटीवारांकडून शिकावं. पोंभुर्णा तालुक्यातील दिघोरी गावातील काही भाविक गुरुकुंज मोझरी येथे 5 एप्रिलला भजनासाठी गेले होते. भक्तिभावात रंगलेल्या या प्रवासाचा शेवट मात्र दुःखद ठरला. परतीच्या वाटेवर, वडनेर (जि. वर्धा) येथे 6 एप्रिल ला त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यात चालक जागीच ठार झाला, तर सहा भाविक गंभीर जखमी झाले.

ही माहिती आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मिळताच, त्यांनी त्यांच्या वैद्यकीय सहाय्यक सागर खडसे यांना रुग्णांची काळजी घेण्यास सांगितलं. सागर खडसे सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात पोहोचले, रुग्णांची भेट घेतली, त्यांच्या नातेवाईकांना आधार दिला. रुग्णालयाच्या अधीक्षक पूनम वर्मा यांच्याशी चर्चा करून सर्व उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्याची विनंतीही केली.

मी स्वतः त्या क्षणी तिथे उपस्थित होतो. जखमी रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान, नातेवाईकांच्या डोळ्यांतले अश्रू आणि त्यामागचं कृतज्ञतेचं मौन… हे सर्व पाहताना एकच भावना मनात आली – हे नातं फक्त मतांचं नाही, माणुसकीचं आहे.

सामान्यांच्या वेदनेत सहभागी होणं, त्यांच्या दुःखात खंबीरपणे उभं राहणं, हे केवळ राजकारणाचं काम नाही; ती माणूस म्हणून असलेली जबाबदारी आहे, आणि ती सुधीर भाऊ प्रत्येक वेळी निभावत आहेत.