🔸 बिअर शॉपी करिता मागितली होती एक लाखाची लाच
✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर (दि.8 मे) :- बिअर शॉपी चा परवाना देण्यासाठी एक लाखाची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्यासह दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे आणि कार्यालय अधीक्षक अभय खताळ या तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .
प्राप्त माहितीनुसार घुगुस येतील ‘गोदावरी बार अँड रेस्टॉरंट’ च्या मालकाने नवीन बियर शॉपी चा परवाना काढण्यासाठी नोव्हेंबर 2023 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग ,चंद्रपूर येथे परवाना मिळण्याकरता अर्ज सादर केला होता .चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील आणि दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी तक्रादारास टाळाटाळ करीत परवाना मंजूर केला नाही.
चेतन खारोडे यांनी तक्रारदारास बियर शॉपीचा परवाना मंजूर करून देण्याचे कामाकरिता संजय पाटील यांचे व स्वतः करिता एक लाख रुपयांची मागणी केली.
यासंदर्भात तक्रारदारांनी लाचलुतपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दिली या तक्रारीवरून 25 एप्रिल 2024 व तीन मे 2024 आणि 7 मे 2024 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान, चेतन खारोडे यांनी तक्रारदारास एक लाख रुपयांची मागणी केली लाच म्हणून मागण्यात आलेले एक लाख रुपयांची रक्कम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्यावतीने स्वीकारली.
लाज घेताना रंगेहात अटक केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला .
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर नागपूर , अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले, लाचलुतपत विभाग चंद्रपूर यांनी पार पाडली.