✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.15 जून) :-
नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. युनिट क्र. 2, गुंज-सवना या साखर कारखान्याने गाळप हंगाम 2025-26 मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,913 रु. प्रति टन अंतिम ऊस दर जाहीर केला आहे. हा दर विदर्भातील सर्वाधिक असल्याचा दावा नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा कृषिभूषण बी. बी. ठोंबरे यांनी केला आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार एफआरपीनुसार हा अंतिम ऊस दर निश्चित करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना ठोंबरे म्हणाले की, नॅचरल उद्योग समूहाने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत विदर्भात सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे.
यंदा कार्यक्षेत्रात अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नसला तरी शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी मदत मिळावी या उद्देशाने ऊस बिलाचा अंतिम हप्ता रु. 213 प्रति टन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन, मशागत आणि खरीप पिकांच्या पेरणीसाठी आर्थिक आधार मिळणार आहे.
गाळप हंगाम 2025-26 मध्ये कारखान्याने सुमारे 5.55 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. या पूर्वी ऊस पुरवठादारांना पहिला हप्ता म्हणून 2,700 रुपये प्रति टन दराने ऊस गाळपा नंतर 14 दिवसांच्या आत रक्कम अदा करण्यात आली होती. उर्वरित 213 रु. प्रति टन रकमेचा दुसरा व अंतिम हप्ता 15 जून 2026 पासून धनादेशाद्वारे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती बी. बी.ठोंबरे यांनी दिली.
या निर्णयामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामाच्या तोंडावर त्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कारखान्याचे धन्यवाद
कालच नॅचरल युनिट 2 गुंज- कडे अंतिम बिल समाधानकारक मिळावे अशी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी केली होती. कारखाना प्रशासनाने दखल घेत 213 रुपये अंतिम बिलाची रक्कम बँकेत जमा केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे रुपये प्रति टन वाढ मिळावी ही अपेक्षा होती, कारण ऊस गाळपासाठी 14 ते 15 महिने प्रतीक्षा करावी लागते. मजूरचे भरमसाठ वाढलेले दर,उत्पादन खर्चावर झालेली वाढ, त्यामुळे ऊस उत्पादकाची अधिक दराची अपेक्षा रास्त आहे. दुसरी बाजू केंद्र व राज्य सरकारचे शेती आणि साखर उद्योगाला पोषक धोरण नाही, तर हा उद्योग आणि ऊस उत्पादक यांना फक्त जिवंत ठेवायचे आहे. कारण देशातील जनतेला स्वस्त साखर देता येईल. पाच टक्के असलेला ऊस उत्पादक पिचला गेला तरी हरकत नाही असं धोरण सुरू आहे. आजूबाजूच्या इतर कारखान्यापेक्षा निश्चितच आपल्या भागातील शेतकरी समाधान आहेत. कारण अजून काही शेतकऱ्यांना इतर कारखान्या कडून पहिलीच उचल मिळाली नाही. आपला सुद्धा 10 ते15 वर्षे पूर्वीचा इतिहास बघितला तर आपल्याच ताब्यात व आपणच निवडून दिलेल्या लोकांनी मोर्चा काढल्या शिवाय कधीच पैसे दिले नाहीत. प्रत्येक गोष्टीत राजकारण त्यामुळे बंद पडलेला उद्योग व्यवस्थित सुरू आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. नॅचरल शुगर कारखान्यात कुठलीही वशिलेबाजी नाही किंवा दुजाभाव नाही तक्रार किंवा योग्य सूचनांची तातडीने दखल घेतल्या जाते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून शासनाकडे कारखाना नोव्हेंबर ऐवजी ऑक्टोबर मध्ये सुरू करण्याची परवानगी मागितली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी संघटीत होऊन संघर्ष करणे आवश्यक आहे, कारण आपल्या विदर्भातील तापमान उर्वरित भागापेक्षा खूप अधिक असते. ऑक्टोबर मध्ये कारखाना चालू होण्याची परवानगी मिळाल्यास वेळेवर गाळप होईल,संचालक ठोंबरे साहेब हे निश्चितच शेतकरी कामगार यांचे कैवारी आहेत, त्यामुळेच मागील 10 वर्षापासून नॅचरल शुगर हा कारखाना महागाव तालुक्यांत सर्वात मोठा उद्योग व्यवस्थित सुरू आहे, पुढे प्रगती पथावर राहिली यात शंकाच नाही. ठोंबरे साहेब व नॅचरल परिवाराचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार….गोविंदराव देशमुख(सवनेकर)ऊस उत्पादक ,शेतकरी







