ग्रामीण कृषी कार्यानुभवासाठी कृषिकन्यांचे गावात आगमन

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.2 जून) : -आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमातील विद्यार्थिनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावात दाखल झाल्या. ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रगतशील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

या कृषी कन्यांमध्ये पुजा दामधर,ऐश्वर्या दरेकर, कोमल सरोदे, श्रुतीका नेमाडे, प्रगती लोखंडे आणि रजनीगंधा रामटेके यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थिनी पुढील तीन महिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिके

घेण्यात येणार असून माती परीक्षण, विविध पिकांची लागवड तंत्रज्ञान, पिकांवरील रोग व किड व्यवस्थापन, जनावरांची काळजी व संगोपन, बीज प्रक्रिया आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. आहेत. या कालावधीत त्या विविध पिकांची पाहणी, शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास, मृदा व पाणी परीक्षण, किड व रोग व्यवस्थापन, पशुसंवर्धन तसेच कृषीविषयक शासकीय योजनांची माहिती देण्याचे कार्य करणार आहेत. याशिवाय शेतकरी मेळावे, कृषी प्रात्यक्षिके, जनजागृती उपक्रम आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील शेतीव्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याबरोबरच महाविद्यालयात संपादित केलेले ज्ञान शेतकऱ्यांच्या हितासाठी उपयोगात आणण्याची संधी या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींना मिळणार आहे. तसेच शेतकरी आणि कृषिकन्या यांच्यातील संवादातून स्थानिक कृषी समस्यांवर उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

या प्रसंगी सरपंच प्रतिभाताई शेरकुरे, उपसरपंच गजानन देहारी, पोलीस पाटील गोपाल किन्नाके व इतर सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्नता प्रभारी डॉ. रामचंद्र महाजन, कार्यक्रम समन्वयक राहुल तायडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. मुकुंद पातोंड व इतर विषयतज्ञ यांचे मार्गदर्शन कृषीकन्यांना लाभले.