🔹वादळात वासराचा मृत्यू,केळी पीकांचे नुकसान वाकोडी,खडका येथे गारपिट
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.26 मे) :-
महागांव तालुक्यांतील सवना, वाकोडी व खडका गारपिट परिसरात मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस व अचानक आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात केळी पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यासह आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सवना येथील शेतकरी विनायक बापुराव देशमुख यांच्या शेतातील शेडमध्ये बांधून ठेवलेल्या गाईच्या वासराचा दुर्दैवी मृत्यू झाला.चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्यामुळे शेडवरील टिनपत्रेही उडून गेली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वादळामुळे गावातील अनेक घरांचे नुकसान झाले. शेतातील केळी पिकांच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. गुरांच्या वैरणीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी वैरण आडवी पडली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. रोडवर अनेक ठिकाणी वृक्ष जमीनदोस्त झाल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याची माहिती आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, वाकोडी येथे चक्रीवादळामुळे केळीची तब्बल 600 झाडे आडवी पडल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपये नुकसानीचा फटका बसला आहे. सवना येथील गोपाळराव सरसमकर तसेच पंजाबराव चव्हाण यांचे केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. खडका परिसरात गारपिट होऊन केळी पिकांना मोठा फटका बसला आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तीव्रतेने पाहणी करून प्रशासनाने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी शेतकरी संघटनेचे गोविंदराव देशमुख सवनेकर यांनी मागणी केली आहे.







