🔸आमणी (बु.) येथे भरधाव दुचाकीने घेतला पेट
✒️शाम बेलगमवार महागाव(Mahagaon तालुका प्रतिनिधी)
महागाव(दि.22 मे) :-
फूलसावंगी वरून महागावकडे येणाऱ्या हिरो होंडा कंपनीच्या सीडी १०० दुचाकीने आमणी (बु.) येथे दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. भरधाव धावणाऱ्या दुचाकीतून अचानक धूर निघू लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चालकाला सुरुवातीला गाडीमधून जळक्या वासासह धूर निघत असल्याचे जाणवले. त्याने तत्काळ प्रसंगावधान राखत दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून स्वतःचा जीव वाचविला. मात्र काही सेकंदांतच गाडीने पेट घेतल्याने आग वेगाने पसरली आणि धुराचे मोठमोठे लोट आकाशात पसरले.
घटनास्थळाजवळच गॅस एजन्सीचे गोदाम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. संभाव्य मोठा अनर्थ टाळण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. काहींनी पाणी व माती टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली होती.
या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक थोडक्यात बचावला.
दरम्यान, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे किंवा दुचाकीच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून वाहनधारकांनी नियमित सर्व्हिसिंग व वायरिंग तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.







