माहुर(वाई)येथे भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

🔸१४२ तरुणांना जागेवरच नियुक्ती पत्रे!!

 ✒️शेख रफीक माहूर(Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि.17 मार्च) :-

   बेरोजगारीच्या आगीत होरपळणाऱ्या, हतबल,नैराश्यग्रस्त तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे आयोजित करण्यात आलेला ‘भव्य रोजगार मेळावा ‘ मोठ्या उत्साहात पार पडला. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्रालय (महाराष्ट्र शासन) द्वारा संचालित, पी. एम. कौशल्य विकास ट्रेनिंग सेंटर, वाई यांच्या वतीने या यशस्वी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

   या मेळाव्याला परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण २५० उमेदवारांनी रोजगारासाठी आपली नोंदणी केली होती. नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली.

कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे निवड झालेल्या १४२ युवक-युवतींना जागेवरच नियुक्ती पत्रे (Offer Letters) आणि रुजू होण्याची तारीख (Joining Date) देण्यात आली. विशेष म्हणजे, 90 टक्के उमेदवारांना २३,००० रुपयांपेक्षा जास्त पगाराची नोकरी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

   ज्या १०० मुलांनी परदेशात नोकरी करण्याची किंवा इतर विशिष्ट क्षेत्रांत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यांचा डेटा आमच्याकडे उपलब्ध असून,त्यांच्यासाठी लवकरच पुन्हा संपर्क साधून संधी उपलब्ध करून दिली जाईल, तसेच वाई येथील माझ्या कार्यालयात दररोज नोंदणी केली जाणार असून, नोंदणी केलेल्यांना आठ दिवसांत नौकरी ची संधी देऊ अशी माहिती आयोजक मनोज किर्तने यांनी दिली. मेळाव्यात काही कारणास्तव हजर राहू शकले नाही अश्यानी सुट्टीचा दिवस वगळता प्रत्यक्ष हजर राहून नोंदणी करणे निरंतर चालू राहील.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय MSP समितीचे सदस्य मा. गुणवंत पाटील हंगरगेकर होते. प्रमुख पाहुणे सरपंच सिताराम मडावी, शिवाजी पाटील शिंदे, कंपनी चे अभिमन्यू शेलार, अतुल पाटील, आदिनाथ आवटी, सार्थक कांबळे, पत्रकार सोमनाथ नागूरे, संभाजी चव्हाण पाटील, शंकर चव्हाण पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.

   हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आयोजक आणि पी. एम. कौशल्य विकास ट्रेनिंग सेंटरचे संचालक मनोज किर्तने, सेंटर हेड आदर्श मनोज किर्तने, कौन्सेलर सौ. नम्रता मनोज किर्तने यांच्यासह स्थानिक पत्रकार आणि ट्रेनिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल व निखळ सामाजिक दायित्व पार पाडल्या बद्दल सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार तथा आयोजक मनोज किर्तने व परिवाराचे तहसीलदार अभिजित जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे,स्वागताध्यक्ष सुधीर बिंदू सह अनेकांनी कौतुक केले आहे.