✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.8 फेब्रुवारी) :-
श्री वासुदेव निवास पुणे, श्री गुरुगौरव दीक्षा शताब्दी महोत्सव, श्री वासुदेव निवास हीरक महोत्सव, परमपूज्य कवीश्वर महाराज पुण्यतिथी रौप्य महोत्सव, परमपूज्य काका महाराज जन्म शताब्दी महोत्सव, परमपूज्य जोशी महाराज अमृत महोत्सव यांचे वतीने भगवतीच्या साडेतीन पिठा पैकी एक असलेले श्रीक्षेत्र माहूर गडावर श्री चंडीयाग यज्ञ आज शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजता संपन्न होणार आहे. यासाठी राज्यातून 200 निवडक साधक कालच डेरेदाखल झाले आहेत.
या भव्य कार्यक्रमाच्या विस्तृत माहितीसाठी परम पूज्य श्री शरद जोशी महाराज, श्री देविदास जोशी महाराज, अरविंद जोशी महाराज व अनंतराव कुलकर्णी महाराज यांनी स्थानिक हॉटेल एकविरा धाम माहूर येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर जवान तैनात असल्याने देश सुरक्षित आहे. देशा अंतर्गत सर्व अंगाने सुरक्षेची कामना करण्यासाठी श्रीक्षेत्र माहूर येथे आज सकाळी 8:00 वाजता पासून श्री चंडीयाग यज्ञ सुरू करण्यात येणार आहे.
श्री वासुदेव निवास पुणे हे प.पू. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रणित श्री गुरुदत्त योग व प.पू. श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज प्रणित कुंडलिनी सिद्ध महायोगाचे आद्यपीठ आहे. परमपूज्य योगीराज श्री गुळवणी महाराज यांनी सन 1965 साली श्री वासुदेव निवास ची स्थापना पुणे येथे केली. जात पात, धर्म भेद आणि लिंग भेद न मानता ज्ञानेश्वर माऊली च्या मानवतावादी विचाराची परंपरा यातून प्रवाही करत आहेत.धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी विचाराचे वहन करत आधी संविधान नंतर धर्मग्रंथ या प्रमाणे पिठाचे कार्य चालू आहे. वासुदेव निवास पुणे येथे कोणतेही कर्मकांड केले जात नाही. गंडे दोरे, वगैरे वगैरे अंधश्रद्धा असल्याचे मानून जागतिक शांततेसाठी महायोग व उपासनेतून सुख समाधान प्राप्त व्हावे. हे कार्य या पिठातून होत आहेत. आसन प्राणायाम जप इत्यादी बाह्य गोष्टीपेक्षा,शाश्वत आत्मसुख देणारा अनुभव म्हणजेच कुंडलिनी सिद्ध महायोग.
यातूनच आनंदप्राप्ती समाधान व शांतता यांचा लाभ होतो असे. प. पू.नारायणरत्न योगचुडामणी योगश्री शरदशास्त्री जोशी महाराज व प.पू.देविदास गंगाधर जोशी महाराज यांनी साधक परिवाराच्या वतीने सांगितले. एका प्रश्नाचे उत्तर देताना धर्मसत्ता आणि राज्यसत्ता या दोन्ही वेगळ्या गोष्टी असून, देश धर्मनिरपेक्ष संविधानावर चालत असल्याने,राज्यसत्तेला प्रश्न विचारून माध्यमांनी चौथा स्तंभ अबाधित असल्याचे सिद्ध करत रहावे असे शेवटी आवाहन केले. या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित राहिले बद्दल त्यांचा यथोचित सन्मान करून आभार व्यक्त करण्यात आले.







