प्रभाग क्र. 2 च्या नवनिर्वाचित नगरसेवक हर्षल गेडाम यांची शिक्षण सभापतीपदी नियुक्ती

🔸नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन

🔹शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणारा निर्णय

✒️ महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.22 जानेवारी) :- नगराच्या शैक्षणिक आणि बौद्धिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी घडामोड घडली असून *प्रभाग क्र. 2 चे नवनिर्वाचित नगरसेवक हर्षल गेडाम यांची नगर परिषद शिक्षण सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे*. या नियुक्तीमुळे नगरातील शैक्षणिक व्यवस्थेला सक्षम, अभ्यासू आणि तरुण नेतृत्व मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

हर्षल गेडाम हे अभ्यासू, ऊर्जावान आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून अल्पावधीतच परिचित झाले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये सक्रिय कार्य करत असताना त्यांनी शिक्षणाशी संबंधित अनेक प्रश्नांवर आंदोलने केली असून, विद्यार्थ्यांचे हक्क, शैक्षणिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शाळा–महाविद्यालयांच्या समस्या यासाठी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. या काळात त्यांनी शैक्षणिक प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधत अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले.

नवनिर्वाचित नगरसेवक असूनही नागरिकांच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांबाबत त्यांची भूमिका नेहमीच सकारात्मक आणि स्पष्ट राहिली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी, शाळांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच शिक्षण व्यवस्थेत आधुनिकता आणण्यासाठी त्यांनी मांडलेले विचार लक्षवेधी ठरले आहेत.

शिक्षण सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हर्षल गेडाम यांनी सांगितले की,

नगरपरिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणसुविधा उपलब्ध करून देणे, डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देणे तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी पोषक व प्रेरणादायी वातावरण निर्माण करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील.

त्यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, नगरपरिषदेतील पदाधिकारी, नगरसेवक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवर्ग, पालक तसेच नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर प्रत्यक्ष कार्य केलेला अनुभव आणि आता शिक्षण सभापती म्हणून मिळालेली जबाबदारी यामुळे हर्षल गेडाम यांची नियुक्ती नगराच्या शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. येत्या काळात शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या हिताचे दूरगामी व सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.