नगर परिषद सभापती पदावरून भाजपमध्ये हिंसक संघर्ष; माजी जिल्हाध्यक्षाला अमानुष मारहाणीचा आरोप

✒️महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.20 जानेवारी) :- 

गडचिरोली नगर परिषदेत सभापती पदावरून भारतीय जनता पार्टीत (भाजप) तीव्र वाद उफाळून आला असून या वादाला हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांना अमानुष मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना माजी खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी घडली असून, नगर परिषद निवडणुकीनंतर सभापती पदाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर परिषद निवडणुकीत अध्यक्ष निवडून आल्यानंतर सभापती पदाची घोषणा होणे अपेक्षित होती. याच पार्श्वभूमीवर माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना विश्वासात न घेता बैठक बोलावली. याला आमदार गटाने तीव्र विरोध केला. या संदर्भात कारणे दाखवा नोटीस स्वरूपात माजी खासदार अशोक नेते यांच्या घरी बैठक घेण्यात आली होती.

बैठकीदरम्यान माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. आरोपानुसार, यावेळी प्रशांत वाघरे यांनी आमदारांना उद्देशून,

“तुला आम्ही आमदार बनवले आणि आज तूच आम्हाला शिकवतोस?”

असे उद्गार काढले.

या वक्तव्यानंतर वातावरण अधिकच तापले आणि दोघांमध्ये हातापाई झाली. या झटापटीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी प्रशांत वाघरे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत राजकारण, गटबाजी आणि शिस्तभंगाबाबत चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणानंतर आज सकाळी भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी नागपूरकडे रवाना झाल्याचे समजते. तेथे भाजपचे वरिष्ठ नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत या वादावर महत्त्वाची बैठक होणार आहे.

दरम्यान, प्रशांत वाघरे आणि गोविंद सारडा यांचा प्रभाव असलेल्या प्रभागांमध्ये काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाल्याची चर्चा आहे. आरोप आहे की प्रशांत वाघरे हे स्वतःच्या प्रभागातही भाजप उमेदवाराला विजयी करू शकले नाहीत, तसेच निवडणूक प्रचारातही त्यांचा विशेष सहभाग नव्हता. तरीही ते पक्षाच्या विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याने पक्षातील नाराजी आणि गटबाजी अधिकच तीव्र झाली आहे.

आता भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांमधील हा गंभीर वाद कसा मिटणार, तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या राजकीय संघर्षाला कोणत्या दिशेने नेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.