🔹कृषी प्रदर्शन, गांधी तिर्थाला दिली भेट आणि कृषी शास्त्रज्ञ सोबत साधला संवाद
✒️गुणवंत चटपकार चिमूर(Chimur तालुका प्रतिनिधी)
चिमूर(दि.16 जानेवारी) :-
विज्ञान, तंत्रज्ञान व शेतकऱ्यांची मानसीकता या विषयावर आयोजित कृषी तिर्थ-जैन हिल्स येथे आयोजित कृषी प्रदर्शनात चंद्रपुर जिल्ह्यातील पत्रकारांनी सहभाग घेतला.
जळगाव येथील जैन इरिगेशन च्या कृषी प्रदर्शनात पत्रकरांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शास्वत विकास, आणि टिश्यु कल्चर प्रयोगशाळेच्या कार्यप्रद्धतीची माहितीची देवाण-घेवाण करण्यात आली. या माहितीमुळे कृषी क्षेत्रातिल नविन संधी आणि आव्हाने याबाबत व्यापक दृष्टीकोन निर्माण होईल. अशी मानसिकता तयार करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील 18 पत्रकारांनी जैन हिल्स येथे असलेल्या गांधी तीर्थ संग्रलयाला भेट देवुन पुज्य महात्मा गांधीजी यांची जिवनशैली समजुन घेतली. या अभ्यास दौऱ्यात जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेड चे माध्यम उपाध्यक्ष अनिल जोशी, देवेद्र पाटील यांनी विशेष माहिती पत्रकारांना दिली. दरम्यान विविध शेतपिकाचे कृषी शास्त्रज्ञांनी माहिती देवुन कमी कालावधी मध्ये जास्त नफा कमवणारा शेती उद्योग यशस्वी होवु शकतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या दौऱ्यात पत्रकार सुरेश डांगे, मनोज डोंगरे, विकास खोब्रागडे, बाळु सातपुते, रामदास हेमके, भरत बंडे, राजकुमार चुनारकर, शुभम रणदिवे, जगदिश पेंदाम संजय नागदेवते, नितीन पाटील, शुभम बारसागडे, प्रकाश पाटील, जितेंद्र गाडगे, सुनिल हिंगणकर, नरेंद्र नागोसे यांनी सहभाग घेतला.
कृषी महोत्सवाबाबत सविस्तर माहिती देताना देवेंद्र पाटील म्हणाले,जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या जैन हिल्स येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. १२ डिसेंबरपासून आजपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमधून सुमारे ३२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली. जैन हिल्सवरील हा कृषी महोत्सव म्हणजे केवळ प्रदर्शन नव्हे, तर प्रत्यक्ष शेतीत वापरता येईल असे अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी आहे असे सांगत पाटील पुढे म्हणाले, शेतकरी येथे येऊन नव्या शेती पद्धती, सुधारित वाण, सूक्ष्म सिंचन व्यवस्था आणि प्रिसिजन शेतीची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके पाहत आहेत आणि त्यातून प्रेरणा घेऊन परत जात आहेत. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पिकांपैकी कांदा, केळी हे पीक आहेत. प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या कांद्याच्या सुधारित व्हरायटी, टोमॅटो लागवड, तसेच करार शेतीच्या माध्यमातून हमी भावाने कांदा व टोमॅटो खरेदीची व्यवस्था कशी उभी केली जाते, याचे सविस्तर मार्गदर्शन येथे मिळत आहे. यासोबतच डाळिंब, मोसंबी, जैन स्वीट ऑरेंज, आंबा, पपई आदी फळपिकांच्या लागवड पद्धतींमध्ये झालेल्या बदलांची माहिती देण्यात येत आहे. अतिसघन लागवड पद्धतीमुळे कमी जागेत, कमी पाण्यात आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळू शकते, याची प्रत्यक्ष उदाहरणे शेतकऱ्यांसमोर मांडण्यात आली आहेत.
सूक्ष्म सिंचन क्षेत्रात ठिबक व तुषार सिंचनासह जैन ऑटोमेशन प्रणालीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. ५० ते १०० एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही प्रणाली कशी उपयुक्त ठरते, सिंचन व फर्टिगेशनद्वारे खतांचे अचूक नियंत्रण कसे साधता येते आणि मजुरीवरील अतिरिक्त खर्च कसा कमी होतो, याचे प्रात्यक्षिक येथे पाहायला मिळत आहे. जैन हिल्सवरील कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने हायटेक शेती, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम आहे. प्रत्यक्ष उभ्या पिकांवर केलेले प्रयोग, शास्त्रोक्त पद्धतींची प्रात्यक्षिके आणि जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे. यावर्षी ‘सायन्स-टेक@वर्क’ ही संकल्पना घेऊन हायटेक, प्रिसिजन आणि क्लायमेट स्मार्ट शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहे. अधिकाधिक शेतकरी बांधवांनी जैन हिल्स येथे येऊन या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जैन इरिगेशनच्या वतीने करण्यात आले आहे.







