बालपणाच्या पायवाटेवर पुन्हा चालताना… शालेय मित्रांचे भावनिक मिलन

✒️गुणवंत चटपकार चिमूर(Chimur तालुका प्रतिनिधी) 

चिमूर(दि.15 जानेवारी) :- 

          श्री राष्ट्रीय विद्यालय, चिमूर येथील वर्ग ५ ते १० सन १९८० ते १९८६ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचे शालेय बालमित्र स्नेहमिलन दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत आनंदी, उत्साही व भावनिक वातावरणात पार पडले. तब्बल ३० ते ३५ वर्षांनंतर बालपणीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र आल्याने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले.

         या स्नेहमिलनाची सुरुवात चिमूर येथील आराध्य दैवत श्री बालाजी महाराज मंदिरात दर्शन व प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर सर्व बालमित्रांनी श्री राष्ट्रीय विद्यालय, चिमूर येथे भेट देत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले तसेच शाळेतील स्वर्गीय शिक्षकांना आदरांजली अर्पण करून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. यानंतर कार्यक्रमाचे आयोजन City Flora Tiger Resort येथे करण्यात आले. येथे गप्पागोष्टी, पतंग उडविणे, नाश्ता व स्नेहभोजनाचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला. वर्गखोलीतील खोड्या, शाळेचे संस्कार, शिक्षकांची शिकवण आणि बालपणीचे दिवस यांची उजळणी करत उपस्थित सर्वजण पुन्हा एकदा आपल्या सुवर्णकाळात हरवून गेले.

       या भावनिक स्नेहमिलनात नागपूर, अकोला, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वणी, वरोरा व चिमूर येथून माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये बबलू नरड, शरद नंदनवार, रवी चल्लावर, सुरेश लाखे, सुभाष अंबादे (नागपूर), अरुण भोस्कर (चंद्रपूर), सुभाष नगराळे (यवतमाळ), मोरेश्वर रासेकर (वणी), ओम मांडवकर (वरोरा), भास्कर धारणे (अकोला), अमोल शंभरकर (ब्रम्हपुरी) तसेच चिमूर येथील सुनील बिरजे, सुभाष केमये, चंदू कामडी, बबलू सातपुते, तुषार काळे, सुभाष लांबे, दत्तू नरड, गिरीष कुंभारे, गिरीश राचलवार, राजू ठाकरे, राजू मडावी, दिलीप उरकुडे, अफरोज पठाण, प्रवीण गणोरकर, चिंतामण नाकाडे, किशोर भोयर, दिनेश तिडके आदी बालमित्रांचा सहभाग होता.

        अशीच मैत्री जपण्यासाठी व शालेय आठवणींना उजाळा देण्यासाठी भविष्यातही दरवर्षी स्नेहमिलन आयोजित करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला.