✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.13 जानेवारी) :-
महागाव नगरपंचायतच्या वतीने आज अत्यंत गौरवशाली आणि प्रेरणादायी असा कार्यक्रम संपन्न झाला.
नगराध्यक्ष सौ. सुनंदा दिलीपराव कोपरकर यांच्या हस्ते राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मातेच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
तसेच युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचेही औचित्यपूर्ण आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीतील मातृत्व, राष्ट्रभक्ती, चारित्र्य व आत्मविश्वास यांचा आदर्श समाजा समोर मांडण्यात आला.
राष्ट्रमाता जिजाऊ माता या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माताच नव्हत्या,तर त्या स्वराज्याच्या संकल्पनेच्या शिल्पकार होत्या. त्यांनी आपल्या संस्कारातून शिवरायांसारखा आदर्श राजा घडवला आणि संपूर्ण देशाला स्वाभिमानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या जीवनातील त्याग,धैर्य, दूरदृष्टी व मातृत्व आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करणे म्हणजे राष्ट्रनिर्मितीच्या मूल्यांना उजाळा देणे होय.त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांनी तरुणाईला आत्मविश्वास, चारित्र्य व राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली. “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” हा संदेश आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ आहे. त्यांनी भारतीय संस्कृतीचा गौरव जगभर पोहोचवला आणि युवकांना सक्षम,स्वावलंबी व राष्ट्रनिष्ठ बनण्याची दिशा दिली.या प्रेरणादायी कार्यक्रमास महागाव शहरातील महिला बचत गटाच्या कर्तृत्ववान महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांचा सहभाग हा जिजाऊ मातेच्या विचारांना खरी मानवंदना ठरला. महिलांच्या सामाजिक, आर्थिक व वैचारिक सक्षमीकरणात बचत गटांचे योगदान मोलाचे असून,अशा कार्यक्रमांमुळे त्यांना नवचैतन्य व नवी ऊर्जा मिळते. कार्यक्रमास महागाव नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे व नगरसेवक सुरेश नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी जिजाऊ माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या विचारांचे महत्त्व विषद केले. समाजाने थोर विभूतींचे विचार आचरणात आणण्याची गरज व्यक्त यावेळी करण्यात वक्त्यांनी व्यक्त केली. महागाव नगरपंचायतच्या वतीने हा जयंती उत्सव केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, समाजाला दिशा देणारा, संस्कार रुजवणारा आणि राष्ट्रप्रेम जागवणारा ठरला. अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांवर चालत महागाव शहर प्रगती, एकोपा व सशक्ततेच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी महागाव नगरपंचायतचे उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे, काँग्रेस पक्षाचे गटनेते नगरसेवक शैलेश कोपरकर,शारदा महिला बचत गटाच्या महिला व नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.







