चिमुरात युरियाच्या नावाखाली शेतकऱ्यांची उघड लूट

🔸कृषी केंद्र चालकांकडून मनमानी दरवाढ – शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर निवटे यांचा खळबळजनक आरोप

✒️गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)

चिमूर(दि.12 जानेवारी) :- 

चिमूर तालुक्यातील कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची सर्रास आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आणि धक्कादायक आरोप शिवसेना तालुकाप्रमुख (शहरी) सुधाकर निवटे यांनी केला आहे. युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांना जादा दराने खत विकले जात असून प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

शासकीय दरानुसार युरिया खताची एक बॅग २६६ रुपये असताना, प्रत्यक्षात मात्र कृषी केंद्र चालकांकडून ३०० रुपये व त्याहून अधिक दर आकारले जात आहेत. विशेष म्हणजे शेतकरी बिलाची मागणी करताच २६६ रुपयांचेच बिल दिले जात असून उर्वरित रक्कम बेकायदेशीरपणे उकळली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकारामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अधिकच अडचणीत सापडत असून कृषी विभाग व संबंधित यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप निवटे यांनी केला. जर प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषी कृषी केंद्र चालकांवर कठोर कारवाई केली नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे