संत तुकाराम महाराज यांची जयंती राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करा

🔸कुणबी समाज सेवा समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.31 डिसेंबर) :- संत श्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज यांची जयंती ज्याप्रमाणे इतर थोर राष्ट्रपुरूष व संतांची जयंती राष्ट्रीय दिन म्हणून साजरी केली जाते. त्याच धर्तीवर संत तुकाराम महाराज यांची जयंती राष्ट्रीय दिन म्हणून साजरी करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने करण्यात आली आह.

मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनानुसार, राज्य शासनाने २०२६ या वर्षात भारतातील तसेच राज्यातील थोर राष्ट्रपुरूष व थोर व्यक्ती यांची जयंती राष्ट्रीय दिन म्हणून साजरी करण्यात यावे, यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकात कुणबी समाजाचे आराध्य दैवत संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचा कुठेही उल्लेख नाही. विशेष बाब म्हणजे राज्यातील अनेक थोर पुरूषांचे संत तुकाराम महाराज हे गुरूस्थानी होते. तरीही त्यांची जयंती राष्ट्रीय दिन म्हणून साजरी केली जात नसल्याने समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे शासनाने संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांची जयंती राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यासाठी सदर परिपत्रकात समाविष्ट करावे, अशी विनंती निवेदनातून केली आहे.

सदर मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. यावेळी कुणबी समाज सेवा समितीचे पी. व्ही. राऊत, पी. पी. भागडकर, पुरूषोत्तम ठाकरे, नगरसेवक रमेश चौधरी, एम. आर. हारगुडे, एम. डी. कामडी, आशिष ब्राम्हणवाडे, प्रभाकर कुबडे, श्रीकृष्ण अर्जुनकर, वासुदेव बट्टे, नंदू वाईकर, अनिकेत राऊत, चेतन गोहणे आदी उपस्थित होते.