घरकुलासाठी कुणालाही पैसे देऊ नयेत

🔸गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांचे आवाहन

✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी) 

माहूर(दि.21 डिसेंबर) :-

पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मंजुरी, तसेच घरकुलाचे हप्ते (बिल) काढण्यासाठी कुणालाही एकही रुपया देण्याची गरज नाही. ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती स्तरावर कोणी पैसे मागितले, कामात अडथळा आणला अथवा लाभार्थ्यांना त्रास दिल्यास त्यांनी रीतसर तक्रार दाखल करावी, असे ठाम आवाहन माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांनी केले आहे.

   माहूर तालुक्यात पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन 2024-25 व 2025-26 या कालावधीसाठी एकूण 9,750 घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी 9,208 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून 542 घरकुलांची मंजुरी अद्याप प्रलंबित आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी टाकरस यांनी दिली.योजनेअंतर्गत आजपर्यंत 8,115 लाभार्थ्यांना पहिला हप्ता,2,737 लाभार्थ्यांना दुसरा हप्ता,

1,613 लाभार्थ्यांना तिसरा हप्ता,तर 24 लाभार्थ्यांना चौथा व अंतिम हप्ता वितरित करण्यात आला आहे.तथापि, इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी वितरित होऊनही केवळ 67 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे, याबाबत गटविकास अधिकारी टाकरस यांनी नाराजी व्यक्त केली. उर्वरित 9,683 घरकुले अद्याप अपूर्ण असून संबंधित लाभार्थ्यांनी आपले घरकुलाचे काम तातडीने पूर्ण करावे,असे त्यांनी स्पष्ट केले.घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी किंवा कोणत्याही हप्त्यासाठी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही, ही बाब त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली. योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, भ्रष्टाचार अथवा गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाशी थेट संपर्क साधावा आणि योजनेचा लाभ पारदर्शक पद्धतीने घ्यावा,असा ठाम सल्ला त्यांनी दिला.