🔹18 पैकी 16 संचालकांनी केला अविश्वास ठराव दाखल
🔸तीन दिवसानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संचालक मंडळास सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या दिल्या सूचना
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.13 डिसेंबर) :-
महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुलाबराव लोभा जाधव यांच्याविरोधात समितीच्या १८ पैकी १६ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. संबंधित प्रस्ताव आज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला. सभापतींकडून सुरू असलेला मनमानी कारभार, बाजार समितीच्या कामकाजातील गैरव्यवहार, संचालक मंडळाला विश्वासात न घेता घेतले जाणारे निर्णय तसेच शेतमाल खरेदी प्रक्रियेत सुरू असलेली लूट या मुद्द्यांवरून संचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सादर केलेल्या प्रस्तावावर १६ संचालकांच्या स्वाक्षऱ्या असल्याची माहिती मिळाली. एक संचालक प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संचालकांना पुढील तीन दिवसांनी सुनावणीसाठी कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. संचालकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत अविश्वास ठराव मंजूर करण्याचा निर्धार दिसून येत असून सभापती गुलाबराव जाधव यांची पदावरून उचलबांगडी होण्याचे संकेत मिळत आहेत. समितीतील अलीकडच्या घडामोडींमुळे आगामी काही दिवसांत बाजार समितीच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







