🔸शंकरपूर परिसरात भीतीचे सावट; ग्रामस्थ आक्रमक
✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चिमूर(दि.6 नोव्हेंबर) :-
शंकरपूर येथील ईश्वर भरडे (वय ५२) या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. भरडे यांचा मृतदेह त्यांच्या शेतापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. गेल्या दीड महिन्यांतील शंकरपूर परिसरातील हा वाघाच्या हल्ल्यातील तिसरा बळी असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ईश्वर भरडे हे दुपारी बाराच्या सुमारास शंकरपूर–आंबोली रोडवरील शेतात कापसाची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत ते घरी परतले नाहीत. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता त्यांची सायकल शेतात उभी आढळली. यानंतर शोधमोहीम सुरू केली असता शेतापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या शरीरावर वाघाच्या नखांच्या खोल जखमा असून एका हाताचा भाग खाल्लेला आढळला.
या घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. शंकरपूर परिसरात गेल्या दीड महिन्यांत वाघाच्या हल्ल्यातील ही तिसरी घटना आहे. १८ सप्टेंबर रोजी लावारी येथील विद्या कैलास मसराम, तर २८ ऑक्टोबर रोजी नीलकंठ भुरे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तिन्ही घटनांचे अंतर सुमारे दोन किलोमीटर आहे. या घटनांमुळे शंकरपूर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप असून काही दिवसांपूर्वी नागभीड–कान्पा मार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी गेल्याने वन विभागावर नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी तातडीने वाघ पकडण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.







