शेख फरीद वझरा धबधब्यात अडकलेल्या नागपूरच्या सात पर्यटकांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले

✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी) 

माहूर(दि.5 नोव्हेंबर) :- 

माहुर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि निसर्गप्रेमींचे आकर्षण असलेल्या शेख फरीद वझरा धबधब्यात रविवारी सायंकाळी मोठा अनर्थ टळला. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने नागपूर येथील सात पर्यटक एक महिला, तीन मुली आणि तीन पुरुष हे धबधब्याच्या पायथ्याशी अडकले होते.रविवारी सायंकाळी सुमारास पाच वाजता ही घटना घडली. पावसाच्या पाण्यामुळे धबधब्यात अचानक वाढलेला जोर पाहून पर्यटकांमध्ये काही क्षण गोंधळ उडाला. परिस्थिती गंभीर होताच, उपस्थित ग्रह रक्षक दलाचे कर्मचारी शत्रुघ्न चांदेकर, तसेच स्थानिक दरगाह चे पुजारी सय्यद इसाक, स्थानिक नागरिक प्रदीप जोशी आणि गोपाळ गीते यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ बचाव मोहीम सुरू केली. या सर्वांनी मिळून मानवी साखळी तयार करत अडकलेल्या सातही पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

त्यांच्या धाडसपूर्ण आणि वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेख फरीद वझरा धबधबा ओसंडून वाहत आहे. या देखण्या धबधब्याचे रमणीय दृश्य पाहण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र, प्रशासनाने पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे. अचानक वाढणारा पाण्याचा जोर आणि घसरणारे दगड हे धोका निर्माण करू शकतात, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या वेळेवर दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक सर्वत्र होत आहे.