राजुरा येथे जिल्हास्तरीय फोटोग्राफर शॉर्ट सर्कल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न

🔸शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणात ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान पार पडल्या स्पर्धा

✒️ सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)

राजुरा(दि.11ऑक्टोबर) :- 

           राजुरा तालुका फोटोग्राफर असोसिएशन व माजी विद्यार्थी संघ, राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय फोटोग्राफर शॉर्ट सर्कल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२५ मोठ्या उत्साहात पार पडली. ही स्पर्धा ४ ते ६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आली होती. या तीन दिवसांच्या क्रिकेट महोत्सवात जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या १६ नामांकित संघांनी सहभाग घेतला. यावेळी स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले .

प्रमुख पाहुणे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ .एस.एम वारकड , उपप्राचार्य डॉ .आर. आर .खेराणी , राजुरा तालुका फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे, छोटू सोमलकर उपस्थित होते तर बक्षीस वितरण समारंभप्रसंगी न .प.माजी सभापती राधेश्याम अडाणीया, रोटरी क्लब अध्यक्ष निखिल चांडक,राजू गोखरे , नितीन कोकाटे ,माजी जि.प.सभापती सुनील उरकुडे , प्रा. डॉ .आर.आर. खेराणी, प्रा.डॉ.संतोष देठे, छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष फुलचंद मेश्राम, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे , प्रसिद्ध छायाचित्रकार गोलू बाराहाते, प्रीतम खोब्रागडे , टी.डी.यु.सी. संघटना गणेश साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मैदानावर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. तीन दिवस चाललेल्या सामन्यांमुळे राजुरात क्रिकेटप्रेमींना एक पर्वणीच ठरली. नेहमी हातात कॅमेरा घेऊन फोटो काढणारे हात स्पर्धेत हातात बॉल आणि बॅट घेऊन स्पर्धेकरिता उतरल्याने ते स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले.स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. अंतिम फेरीत दोन उत्तम संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाने प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला.स्पर्धेनंतर विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक चषक, प्रमाणपत्रे व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक कॅमेरा हिरोज संघ चंद्रपूर यांना १४ हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह रोटरी क्लब राजुरा यांच्याकडून देण्यात आले, द्वितीय क्रमांक रॉयल कॅमेरा संघ भद्रावती यांना १० हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह नितीन कोकाटे कृष्णा कॅटर्स यांच्याकडून देण्यात आले, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस हाय शटर संघ चंद्रपूर यांना ७ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह राधेश्याम अडाणीया माजी सभापती नगरपरिषद राजुरा यांच्याकडून देण्यात आले.

उत्कृष्ट फलंदाज रोहित फाले ,उत्कृष्ट गोलंदाज नकुल मुसळे ,उत्कृष्ट यष्टीरक्षक रक्षक सचिन कळस्कर ,मॅन ऑफ द मॅच फायनल अर्जुन मेश्राम , मॅन ऑफ द सिरीज श्रीपाद भाकरे तसेच एम्पायर आशीर्वाद चिंचाळकर नितीन खरवडे जतिन वर्मा कॉमेंट्रेटर कोमिल मडावी, भूपेंद्र थोरात यांचेसह २५ प्रायोजकांना सन्मानचिन्त्र देऊन गौरविण्यात आले.राजुरा तालुका फोटोग्राफर व माजी विद्यार्थी संघाचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमुळे क्रीडाविश्वात सकारात्मक ऊर्जा संचारली असून, अशा प्रकारच्या स्पर्धा नवोदित खेळाडूंना आपली कला दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतात, असा सूर नागरिकांतून व्यक्त होत आहे.यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तथा फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा .सुयोग साळवे यांनी केले तर आभार अनिल लेखराजनी यांनी मानले.

यावेळी राजुरा शहरात प्रथमच फोटोग्राफरच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या.त्यामुळे शहरातील सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद घेत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राजुरा तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या सर्व सभासदांनी विशेष योगदान दिले.