🔸ग्रा.प. प्रशासनाचे अतिक्रमणधारकास पाठबळ मिळत असल्याचा आरोप
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.11 ऑक्टोबर) :-
मागील 33 वर्षापासून महागांव तालुक्यांतील माळकिन्ही येथील बौद्ध अनुयायांकडून बहुजनांचे अस्तित्व, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती माळकिन्ही द्वारा पुतळ्याची स्थापना करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डला तशा प्रकारची गाव ‘नमुना आठ अ’ ला नोंद देखील आहे. परंतु त्या जागेवर येथील एका व्यक्तीने घराचे बांधकाम करीत अतिक्रमण केल्याने समस्या उद्भवली आहे. यामुळे येथील रहिवासी समाज बांधवांच्या भावनेला तडा गेला आहे. त्यामुळे करण्यात आलेले अतिक्रमण तातडीने काढून होऊ घातलेले बांधकाम तात्काळ थांबवावे, अशा आशयाचे पुतळा समितीच्या वतीने अनिल लहाने यांनी गुरुवारी महागाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या द्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली.
येथील गंगाराम सटवा लहाने व दीपक गंगाराम लहाने ह्या व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेल्या परिसरातच अतिक्रमण करून घराचे बांधकाम करीत आहे. 1992 पासून ह्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीने मागील ते 33 वर्षापासून पुतळा जागेबद्दल कोणताही वाद नसल्याने या ठिकाणी पुतळ्याची स्थापना केली.
स्थापन केलेल्या पुतळ्याच्या नियोजित जागेचे क्षेत्रफळ 50 बाय 25 असे होते. या ठिकाणी समाजातील विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. सदर जागे संदर्भात माळकिन्ही ग्रामपंचायतला गाव ‘नमुना आठअ’ ला नोंद असल्याचे पुतळा समितीचे म्हणणे आहे. सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याने समाज बांधव अतिक्रमण धारकाच्या विरोधात एकवटले आहेत. शासनाकडे या गंभीर बाबीची गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली. समितीद्वारे माळकिन्ही ग्रामविकास अधिकाऱ्यांना रीतसर पुतळ्याच्या नियोजित जागेची नोंद असल्याने ग्रामपंचायत रेकॉर्डनुसार गाव ‘नमुना आठ अ’ मागणी करण्यात आली. परंतु ग्रामपंचायत रेकॉर्डला या संदर्भात नोंदच नसल्याचे लेखी स्वरूपात पत्र ग्रामविकास अधिकाऱ्या मार्फत समितीला देण्यात आले.
या मुळे ग्रामपंचायत माळकिन्ही येथील ग्राम विकास अधिकारी अतिक्रमण धारकास पाठीशी घालत असल्याचा संबंधितांनी आरोप केला. पुतळ्याच्या जागेवरील होत असलेले अतिक्रमण तातडीने काढून संबंधित व्यक्तीचे चालू असलेले काम करण्यात यावे. 1992 या काळातील नोंदीनुसार असलेली जागा पुतळा परिसराच्या चतुर्शमेला लागून असलेल्या जागेचे क्षेत्रफळ व नोंदणी नुसार संबंधित व्यक्तीला जागा देऊन बाकीची उर्वरित जागा ही समितीच्या ताब्यात देण्यात यावी. सदर प्रकरण अनेक दिवसांपासून वादात असल्याने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले जावे. अतिक्रमण धारकाकडून कुठल्याही प्रसंगी अनुचित प्रकार घडून आणल्या जाऊ शकते, त्यामध्ये समितीच्या सदस्यच्या जीविताची हानी सुद्धा होण्याची तक्रारीतून शक्यता वर्तवली आहे.
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी या गंभीर विषयावर तातडीने लक्ष घालून प्रकरण तत्परतेने निकाली काढावे, असे पुतळा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली. देण्यात आलेल्या निवेदनावर अनिल लहाने, दीपक लहाने, विनोद लहाने, केशव लहाने, भीमराव पाईकराव, सुनील भोने, राहुल गायकवाड, संतोष ढगे, भीमराव लोखंडे, रवी लहाने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यासंदर्भात मुख्य कार्यकारी,पोलीस अधीक्षक यवतमाळ तसेच महागाव तहसीलदार यांना कळविण्यात आले.







