उमरखेड,महागावला दोन दिवसांत मदत यादीत समाविष्ट करा ;अन्यथा तीव्र आंदोलन करु…साहेबराव कांबळे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस

🔸दोन्ही तालुक्याला सरकारची निर्लज्ज उपेक्षा ; दिवाळीपूर्वीच मदतपोहोचवण्याचेही आव्हान

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.11 ऑक्टोबर) :- 

यंदाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि पैनगंगा व पूस नदीच्या महापुराने उमरखेड व महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः शंभर टक्के नुकसान होऊन,जगणे अवघड झाले. पिकांसह शेत जमिनीचेही मोठे नुकसान होऊन शेतकरी मरणाच्या खाईत उभा असतांना,राज्य सरकारने 9 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या मदतीच्या यादीत या दोन तालुक्यांचे नावच वगळले आहे. या भोंगळ निर्णयामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला.यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका करीत,येत्या दोन दिवसात उमरखेड महागाव तालुक्यांची नावे मदत यादीत सामावून घेत दिवाळी पूर्वीच मदत पोहोचवा,अन्यथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गर्भित इशारा दिला. 

   साहेबराव कांबळे यांनी सांगितले की, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने दोन्ही तालुके पूर्णतः उद्ध्वस्त झाले. हजारो हेक्टरवरील पिके वाहून गेली.जमिनीची धूप झाली, आणि शेतकरी कर्जाच्या वावटळीत सापडला. काँग्रेसने यापूर्वीच भरघोस मदतीची मागणी केली होती.

काँग्रेसने निवेदन व आंदोलनही केले,मात्र सरकारने केलेली मदत ‘तोकडी- अन्यायकारक’ असल्याचा आरोप काँग्रेसने केला. कांबळेंनी राज्यसरकारला इशारा देत सांगितले की, उमरखेड व महागाव तालुके, येत्या दोन दिवसांत मदतीच्या यादीत समाविष्ट करा अन्यथा दिवाळीपूर्वी तीव्र आंदोलन छेडले जाईल.अन्यायामुळे एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली,तर राज्यसरकार व त्यांच्या प्रतिनिधीस जबदार धरण्यात येईल,असा प्रसंगी हल्लाबोल केला‌.यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसानग्रस्त तालुके म्हणून नोंद असूनही,उमरखेड आणि महागाव यांना वगळणे ही शासनाची निष्ठुरता आणि असंवेदनशीलता असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.यामुळे राज्य सरकार आता काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या. ऐन दिवाळीत पुन्हा एकदाअनेक शेतकऱ्यांसह काँग्रेस आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.