✒️ सौ .सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा(दि.7 ऑक्टोबर) :– राजुरा शहरातील सोमनाथपूर आठवडी बाजार परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नाली तुटून पडली असून रपटा पूर्णपणे खराब झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून जाण्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
दिनांक 5 जुलै 2025 रोजी रहिवाशांच्या वतीने नगर परिषद राजुरा यांच्याकडे या समस्येबाबत निवेदन देण्यात आले होते. सोमनाथपूर बाजार परिसरातील नागेश मडावी यांच्या घराच्या बाजूचा रपटा तुटल्याने तेथून जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत असून, याच ठिकाणी नाली सुद्धा कोसळली आहे. नगर परिषदेकडून कर्मचाऱ्यांनी जागेवर पाहणी केली असली तरी कामाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगर परिषदेचे कर्मचारी यांनी १५ ऑगस्टनंतर १६-१७ ऑगस्टला काम सुरू करू असे सांगितले होते, मात्र दोन महिन्यांनंतरही दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. जर एखादा मोटारसायकलस्वार या ठिकाणी पडून जखमी झाला, तर जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा जिल्हा अध्यक्ष रवींद्र आर. पी. आत्राम यांनी नगर परिषद राजुरा मुख्याधिकारी (C.O.) यांना पुन्हा एकदा 7 ऑक्टोबर 2025 रोजी निवेदन देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.







