✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.21 सप्टेंबर) :-
महागाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांची बदली माहूर पंचायत समिती येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या कडील प्रभार पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी विजय खिल्लारे यांच्या कडे सोपविण्यात आला होता. परंतु प्रभारी असल्या मुळे गेल्या काही महिन्या पासून कायम स्वरूपी गटविकास अधिकारी हे पद रिक्त होते. परंतु आता मात्र नांदेड जिल्ह्यातील भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डि.एस. कदम यांची महागाव पंचायत समितीच्या कायम स्वरूपी गट विकास अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकताच बुधवारी दुपारी गटविकास अधिकाऱ्याची सूत्रे हाती घेतली आहेत.
महागाव पंचायत समिती अंतर्गत 77 ग्रामपंचायती असून तालुक्यांचे क्षेत्रही मोठे आहे. ग्रामीण भागातील विकास कामे करण्यासाठी तालुक्याला एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची आवश्यकता असते. जेणेकरून गोरगरीब नागरिक ग्रामीण भागातून पंचायत समितीला आपल्या कामासाठी येतात आणि त्यांची कामे व्हावी ही त्यांची इच्छा असते. अनेक ग्रामपंचायती मध्ये अजूनही म्हणावा तसा विकास झालेला नाही. शासन निधी उपलब्ध करून देत नसल्याने अनेक योजना जैसे थे स्थितीत आहेत. परंतु भोकर पंचायत समिती येथून बदलीवर आलेले गटविकास अधिकारी बी. एस. कदम यांनी नुकताच महागाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्या कार्यकाळा मध्ये ग्रामीण भागातील रखडलेला विकास पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अनेक ग्रामपंचायत अंतर्गत 2024 /25 या वित्तीय वर्षातील पंधराव्या वित्त आयोगातील निधी आहे. परंतु हा निधी खर्च होत नसल्याने जशास तसा पडून असल्याचे बोलल्या जाते. द्वितीय वर्ष 2024 /25 आणि 2025/26 मधील आराखड्यातील विविध कामे नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी कदम हे मार्गी लावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा या कडेही गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. आज तालुक्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या प्रचंड आहे, परंतु त्यांना शिकविण्या कामी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणावर विपरीत परिणाम होत आहे. संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान अंतर्गत अनेक गावे स्वच्छतेकडे वाटचाल करत असली तरी अजूनही काही गावात अस्वच्छता आहे.
विकासात्मक कामे करून गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यात वेगळा ठसा निर्माण करावा, अशी तालुक्यातील जनतेतुन अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी गटविकास अधिकाऱ्याचा महागाव तालुका शासकीय कंत्राटदार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे अध्यक्ष अरबाज खान पठाण, गुट्टे ठेकेदार, बंटी पठाण, जमीर नवाब, किशोर आडे, प्रकाश जाधव आधी कंत्राटदार उपस्थित होते.







