माहूरमध्ये “नमो उद्यान” उभारणीसाठी १ कोटींचा निधी मंजूर

✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी) 

माहूर(दि.20 सप्टेंबर) :- 

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने “वैशिष्ट्यपूर्ण” योजनेअंतर्गत माहूर नगरपंचायतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, या निधीतून शहरात भव्य “नमो उद्यान” उभारण्यात येणार आहे.

या उद्यानामुळे माहूर शहरातील नागरिकांना हिरवाईने सजलेली, सुसज्ज आणि आधुनिक सोय-सुविधांनी परिपूर्ण अशी विश्रांतीची जागा उपलब्ध होणार आहे. उद्यानात मुलांसाठी खेळण्यांची साधने, नागरिकांसाठी व्यायाम साहित्य, वॉकिंग ट्रॅक तसेच आरामदायी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळून शहरातील जीवनमान अधिक आरोग्यदायी व समृद्ध होईल.शहराच्या सौंदर्यीकरणासोबतच नागरिकांमधील सामाजिक एकात्मता व आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळावी, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश असल्याचे नगरपंचायतीकडून सांगण्यात आले.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे यांचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी आभार मानले आहेत.