🔹अष्टविनायक गणेश मंडळातर्फे 52 रक्तदात्यांचे रक्तदान
🔸स्व. अर्जुन देशमुख यांचे स्मृतीस उजाळा देण्यासाठी मित्र सरसावले
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.7 सप्टेंबर) :- आपल्याला समाजाप्रती काही देणे असते ही भावना जोपासत महागाव येथील अष्टविनायक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक समाजाभिमुख रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवित अपघाती निधन पावलेल्या स्व.अर्जुन गजेंद्र देशमुख यांच्या स्मृतीस अनोख्या पद्धतीने उजाळा दिला. 5 सप्टेंबर रोजी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करून 52 रक्तदात्यांनी उस्फूर्त सहभाग घेत रक्तदान करून गरजूंना जीवदान दिले.
या पवित्र कार्यातून एकीकडे सामाजिक जाणीव जागृती झाली तर दुसरीकडे अर्जुनच्या आठवणींना उजाळा मिळाला. 17 जानेवारी 2025 रोजी अर्जुन गजेंद्र देशमुख व अजय सतीश वीरखेडे या दोन मित्रांचा अपघात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीवर धडकून झाला होता. त्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळला. दोघेही उमदे मनमिळाऊ तरुण मित्र होते. आज आठ महिन्यानंतर ही अर्जुनच्या आठवणी त्यांच्या मित्रांच्या, कुटुंबीयांच्या आणि गावकऱ्यांच्या मनात ताज्या आहेत. त्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणले परंतु त्याचवेळी दिवंगत मित्रासाठी काही करण्याची धडाडी सुद्धा या तरुणांनी दाखविली.
त्यासाठी शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर हे फक्त एक उपक्रम नव्हता तर ते मानवतेच्या मूल्यांची नाते सांगणारे उदाहरण होते. 52 रक्तदात्यांनी या मध्ये उत्साहाने भागघेत आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली. अर्जुन देशमुख यांच्या स्मृति प्रित्यर्थ या आधीही पुसद येथील जीवन ज्योती प्रबोधन संस्थेतील अनाथ मुलांना कपडे वाटप तसेच निराधार व्यक्तींना अन्नदान करून सामाजिक जाणीव जोपासली गेली. स्व. अर्जुन देशमुखच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी अर्जुन देशमुख फाउंडेशन ट्रस्टची स्थापना करण्यात आल्याचे अँड. गजेंद्र देशमुख यांनी वार्तालाप करतांना सांगितले. ही ट्रस्ट समाजसेवा शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात काम करणार आहे.
अर्जुनच्या स्वप्नांना मूर्तस्वरूप देणार आहे. शुक्रवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अष्टविनायक गणेश मंडळाचे कार्यकर्ते बाळू पाटील नरवाडे, यज्ञेश गाडबैले, ऋषिकेश कोपरकर, टिक्कू डोंगरे, चिकू दळवे, दर्शन नरवाडे, गुड्डू सांगडे, देवानंद सुरोशे, वैभव कोपरकर, योगेश जाधव, गौरव नरवाडे, अमेय पाटील यांनी विशेष अथक परिश्रम घेतले आहे.







