🔸विधवा शेतकरी महिला शेतासाठी रस्ता खुला करून मिळत नसल्याने प्रचंड विवंचनेत
🔹2 सप्टेंबर रोजी लोकशाही दिनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि .2 सप्टेंबर) :- तालुक्यातील माळकिन्ही येथील विधवा महिला शेतकरी सीमा संतोष लहाने यांना शेतात जाण्या साठी असलेला रस्ता अडवल्यामुळे त्यांच्या शेतातील चार एकर तुरीची गंजी पडून राहिली. या विरोधात त्यांनी महागाव तहसील प्रशासनाला 3 फेब्रुवारी 2025 ला पहिला अर्ज दिला.त्या वर सुनावणी देखील झाली. सीमा संतोष लहाने यांच्या बाजूने आदेश देखील आला होता.परंतु त्या आदेशावर स्टे आल्यानंतर हे प्रकरण उमरखेड येथील एसडीओ कार्यालयाकडेत गेले.एसडीओ कार्यालयामध्ये सुद्धा सीमा संतोष लहाने यांची न्याय्य बाजू समोर आल्यानंतर एसडीओ कार्यालयाने देखील त्यांच्या बाजूने 4 ऑगस्ट 2025 रोजी रस्ता खुला करून देण्याचा आदेश दिला आहे.
ह्या आदेशाला जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. अद्याप पावेतो महागाव तहसील प्रशासन अंमलबजावणी करू न शकल्याने मासी कुठे सिंकली याचा थांगपत्ता लागत नाही. तहसील प्रशासन एका विधवा महिला शेतकऱ्याचा अंत पाहत आहे की काय? हा प्रश्न निर्माण उद्भवत आहे. सदर महिला कुटुंबीय शेतकऱ्यांचे शेती व्यवसायावर उदरनिर्वाहाची भिस्त असल्याने सदर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. एसडीओ कार्यालयाने महागाव तहसील प्रशासनाला सदर कुटुंबाच्या शेताच्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्याचे आदेश असतांना वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार होतो आहे.
तात्काळ ह्या संदर्भात न्याय मिळावा ह्यासाठी 2 सप्टेंबर रोजी यवतमाळ येथे लोकशाही दिनानिमित्त सीमा संतोष लहाने यांच्यासह भारत मुक्ती मोर्चाचे विद्वान केवटे यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.या वेळी शुभम खंदारे,अनिल लहाने,मुनव्वर खान, जयशील कांबळे,समाधान पंडागळे आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.







