संघर्ष योद्धा जरांगे पाटीलांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवीत राज्य महामार्गावर रास्तारोको

🔸महागाव येथे राज्य महामार्गावर संभाजीराजे चौकात मातोश्री शाळेसमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.1 सप्टेंबर) :- मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या कायम मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू ठेवून आहेत. या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. राजधानी भगवीमय झाली असतांना,या पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. नागपूर तुळजापूर राज्य महामार्ग 361 वर आंदोलन करण्यात आले.

     01 सप्टेंबर रोजी अकरा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली होती. मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षण मागणी आंदोलन चालू आहे.आझाद मैदानावर आंदोलनाचा आज चौथा दिवस सुरू आहे. जोपर्यंत ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत लढा चालूच राहणार आहे‌.

संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या या ठाम निर्णयामुळे महागाव तालुक्यातील बहुसंख्य मराठा युवक मुंबईमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले. मुंबईत आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवारी महागाव येथे नागपूर तुळजापूर राज्य महामार्ग 361 वर शहरालगत असलेल्या बायपासवर छत्रपती संभाजीराजे चौक, मातोश्री शाळेजवळ सकल मराठा बांधवाकडून रस्तारोको आंदोलन करण्यात आले. सतत एक तासावर चालू असलेल्या या रास्तारोको दरम्यान राज्य महामार्गावर दोन्हीही साईडने वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. या रास्तारोको मुळे एक तास महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

महागाव येथील सकल मराठा बांधवाकडून रस्तारोको आंदोलन करण्यात आले या रस्ता रोको आंदोलनात प्रचंड संख्येने सकल मराठा बांधव सहभागी झाले होते. या रास्तारोको दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या वेळी आंदोलनकर्त्याच्या मागण्या शासनाकडे कळविण्यात आल्या.