अस्वलाच्या भीषण हल्ल्यात दगडथर येथील दुसरा शेतकरी गंभीर जखमी

🔹दीड महिन्यांत अस्वलाच्या हल्ल्याची दुसरी घटना

✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.17 जून) :-

महागांव तालुक्यांत अस्वलाच्या हल्ल्यात पुन्हा एका शेतकऱ्यावर हल्ला झाल्याची घटना घडल्याने परिसरात वन्यप्राण्याची प्रचंड दहशत पसरली आहे.शेतकऱ्यांतून वन्य प्राण्या बाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडथर येथील दीड महिन्यांतील अस्वलाच्या हल्ल्याची दुसरी घटना घडली आहे.

  तालुक्यांतील दगडथर येथे आज मंगळवारी 16 जून रोजी सकाळी अस्वलाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने ग्रामस्थांत संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडथर येथील शिवाजी परसराम खराटे (46) हे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भावाच्या शेतातून बैल आणावयास जात असतांना झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. 

  प्रत्यक्षदर्शी आणि ग्रामस्थांच्या माहिती नुसार अस्वलाने झडप घालत त्याच्या शरीराच्या पार्श्वभागावर गंभीर जखमा केल्या. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, खराटे रक्तबंबाळ अवस्थेत घटना स्थळी कोसळले. आरडाओरड ऐकून ग्रामस्थांनी घटना स्थळी धाव घेतली. जखमी खराटे यांना प्रथम उमरखेड येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारा साठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात हालविण्यात आल्याचे समजते. डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शिवाजी खराटे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या व्यक्तीवर अचानक ओढावलेल्या या संकटामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीची आर्थिक मदत,विशेष भरपाई आणि कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी मदतीची मागणी केली आहे.

दीड महिन्यात या भागात अस्वलाचा दुसरा प्राणघाच हल्ला

गेल्या काही महिन्यांत दगडधर शेत शिवारात वन्य प्राण्याचा वावर वाढण्याचे निदर्शनास येत आहे. मागील दीड महिन्यापूर्वी येथील शेतकरी उत्तम मारुती खराटे (55) यांच्यावर अस्वलाने प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेत शेतकऱ्यांचे दोन्ही डोळे निकामी झाले.अद्यापही सदर शेतकऱ्याला जीवन मृत्यूशी संघर्ष करावा लागत आहे. या पाठोपाठ आता पुन्हा अस्वलाने हल्ला करून दुसऱ्या शेतकऱ्याला जबर जखमी केले. अस्वलाच्या, वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने प्रभावी मोहीम राबवावी अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.