🔸मानिकगड ते विरूर स्टेशन रेल्वे मार्ग बनला वन्य प्राण्यांसाठी मृत्यूचा साफळा
✒️राजुरा(Rajura विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.10 जून) :-
राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नलफडी येथील कक्ष क्रमांक १७९ येथून जाणा-या बल्लारशाह – काजीपेठ रेल्वे डाउन लाईन मध्ये दिनांक ९ जून रोजी रात्री अंदाजे ८ वाजण्याच्या दरम्यान एक तीन महिन्याचा बिबट वन्यप्राण्यांचा मादी बछडा रेल्वेची धडक बसल्याने मृत अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी वन विभागाला दिली. यानंतर वन पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृत बिबटच्या शरीराची तपासणी केल्यावर हा तिन महिन्याचा बिबट बछडा असल्याचे निदर्शनास आले. शवविच्छेदन राजुरा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एन.पी.तेलंगे यांनी केले. यानंतर अधिकारी व साक्षीदार यांचे उपस्थितीत मृत बिबटचे दहन करण्यात आले.
बल्हारशाह ते काजीपेठ हा मध्य दक्षिण रेल्वे मार्ग राजुरा तालुक्यातून जातो. यातील मानिकगड व विरूर स्टेशन या छोट्या रेल्वे स्थानका दरम्यान वन्यप्राणी रेल्वेमार्ग ओलांडून जात असतात. येथे गेल्या अडीच वर्षांत वाघ, बिबट, आस्वल, रानडुक्कर अशा एकुण १७ ते २० वन्यप्राण्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. या घनदाट जंगलात वन्यप्राण्यांना रेल्वेमार्गाचे खालून मार्ग आणि रेल्वेमार्गाचे दोन्ही बाजूंना उंच लोखंडी कुंपनाची गरज आहे. मात्र अजून वनखाते अथवा रेल्वे विभागाला जाग आली नाही.







