🔸भावाचा जागीच मृत्यू;बहीण गंभीर जखमी
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.29 एप्रिल) :-
जनावरांची वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने समोरुन येणाऱ्या दुचाकीवरील बहिण भावाला धडक दिली. या घटनेत भाऊ जागीच ठार झाला तर बहीण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी 29 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता घडली. घटनास्थळा वरून पिकप वाहन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नागरिकांनी जखमी झालेल्या बहिणीला उपचारासाठी तातडीने हलविले.
बुद्धभुषण राजु भालेराव (वय 29 वर्ष) रा.लक्ष्मीनगर (पुसद) हा आपल्या दुचाकी (क्र.एम.एच.29 सी.इ 3312) वरुन बहीण विशाखा राजु भालेराव (वय 26 वर्षे)हिला पेपर परीक्षे दरम्यान माहुर येथे घेवुन जात असतांना हिवरा (संगम) येथील मुस्लिम कब्रस्तान जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या जनावरांची वाहतुक करणाऱ्या पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. यात बुद्धभुषण हा जागीच ठार झाला तर बहिण विशाखा ही गंभीर जखमी झाली असुन यात तिच्या डोक्याला,पायाला व कंबरेला जबर मार लागल्याची माहिती आहे.
अपघात घडल्या नंतर सदर पिक चालकांने वाहनासह घटना स्थळा वरून आपले वाहन घेवुन पळ काढला.अपघात घडल्या नंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी युवतीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविले.
सदर घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अपघात घडल्या नंतर पळून जाणाऱ्या पिकअप वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपासकामी महागाव पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले. पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड,बिट जमादार अतिश जारंडे,गजानन एडतकर,वसीम शेख व कर्मचारी करीत आहेत.







