शेकापूर ग्रामपंचायत अधिकारी नामदेव देवकते यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि.25 एप्रिल) :-

तक्रारदार समाधान अशोकराव कांबळे हे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मागण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून तक्रार परत घेतल्याशिवाय तुझे कोणतेही काम करत नाही जा रे धेड्या असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून खोट्या केस मध्ये अडकविण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारदार समाधान अशोकराव कांबळे, धंदा- शेती, व्यापार व वार्ताहर रा. शेकापूर ता. माहूर. समाधान अशोक कांबळे हे बुद्ध व भीम अनुयायी व्यक्ती आहे. गैरअर्जदार हा ‘लोकसेवक असून तो ग्रामपंचायत शेकापूर ता. माहूर येथे ग्रामपंचायत अधिकारी पदावर कार्यरत आहे. शासनाच्या महापुरुषांच्या जयंती साजरी करण्या बाबत शासनपरिपत्रक असतांना त्यांनी गत दोन वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालय शेकापूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती साजरी केली नसल्याने समाधान कांबळे हे 15/04/2025 व

15/04/2026 असे सलग दोन वर्षे ग्रामपंचायत अधिकारी नामदेव सुभाष देवकते यांचे विरुद्ध मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय माहूर यांचे कडे तक्रारी सादर केलेल्या आहेत.दि. 22/04/2026 रोजी वेळ अंदाजे सकाळी 10:30 वा. च्या सुमारास ते त्यांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मागण्याकरिता ग्रामपंचायत कार्यालय शेकापूर येथे गेले असता ग्रामसेवक नामदेव देवकाते हे त्यांच्याशी उद्धटपणे बोलून त्यांना म्हणाला की माझ्या विरुद्ध तू नेहमीच तक्रारी करतोस तू आता माझ्याविरुद्ध मा. गट विकास अधिकाऱ्याकडे सादर केलेली तक्रार मुकाट्याने परत घे ! जर तू तक्रारमागे घेतली नाहीस तर तुला खोट्या केस मध्ये अडकवून जेलमध्ये पाठवतो” असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावेळी समाधान कांबळे हे त्यांना तुम्ही शासनाचे परिपत्रक असतांना दोन वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत नाही.

मग आम्ही तक्रार का करू नये? असे विचारले असता ते म्हणाले कि ग्रामपंचायत मध्ये जयंती साजरी करण्यात आली आहे. त्यावेळी तुम्ही हजर होते का असे विचारले असता माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता पुन्हा उद्धटपणाने बोलून मी कोणाची जयंती साजरी करायची ती माझी मर्जी मला विचारणारा तू कोण ? मी शासकीय अधिकारी आहे! तुझ्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची पोलीस तक्रार करून तुला जेलमध्ये पाठवतो आणि पुन्हा जर माझ्या नादी लागलास तर तुला उचलून नेऊन गायब करून टाकतो असे म्हणून वारंवार जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व ग्रामपंचायत मधून बाहेर निघून गेला.

करिता शेकापूर ग्रामपंचायत अधिकारी नामदेव सुभाष देवकते याचे विरुद्ध दिनांक 23/04/2026 रोजी भारतीय न्याय संहिता कलम 352, 351(1), 352(2), अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 3(1) r, 3(1)s, 3(2) va अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील कारवाई माहूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक देविदास चोपडे हे करीत आहेत. तसेच माहूर पोलिस उपविभागीय अधिकारी प्रमुख अपिलीय अधिकारी किरण भोंडवे साहेब हे सुद्धा पुढील तपास करीत आहेत.