✒️गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)
चिमूर(दि.13 मार्च) :-
देशभरात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त आहेत. अशातच केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या दरात वाढ केली तसेच गॅस बुकिंगचा कालावधी वाढविल्यामुळे जनतेच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ तालुका काँग्रेस कमिटी चिमूरच्या वतीने गुरुवार (दि. १२ मार्च) रोजी तहसील कार्यालय चिमूर समोर जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी व गॅस बुकिंगचा कालावधी कमी करावा, अशी मागणी केली. वाढती महागाई, भ्रष्टाचार आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व मजुरांचे जीवन अधिक कठीण झाले असून गॅस दरवाढीचा निर्णय हा जनतेवर अन्याय करणारा आहे, असा आरोपही करण्यात आला.
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार चिमूर यांना निवेदन देण्यात आले. सरकारने या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही तर येत्या ७ दिवसांत उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







