🔸महागाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रंजना आडे विराजमान
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.27 फेब्रुवारी) :-
महागाव न.प. च्या राजकारणात मोठी उलथा पालथ घडवत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत सिद्ध करत सत्ता हस्तगत केली.काँग्रेसच्या ताब्यात असलेली नगराध्यक्ष पदाची धुरा आता भाजपकडे आली असून भाजपच्या नगरसेविका रंजना आडे यांची १२ विरुद्ध ५ मतांनी नगराध्यक्ष पदी निवड झाली. काँग्रेसच्या उमेदवार रुपाली कोल्हकर यांना केवळ ५ मतावर समाधान मानावे लागले. अखेर अनेक घडामोडीनंतर महागाव नगरपंचायत युवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा उभारला गेला.
यापूर्वी काँग्रेसच्या सुनंदा कोपरकर या नगराध्यक्ष पदी कार्यरत होत्या. मात्र काही नगरसेवकामध्ये नाराजीचा सूर उमटत गेला आणि अखेर 16 फेब्रुवारी रोजी अविश्वास ठराव दाखल झाला. सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाली,विश्वास ठरावापासून ते अध्यक्ष निवडी पर्यंतच्या राजकीय हालचाली मध्ये काँग्रेसचे चार तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चा एक नगरसेवक भाजपच्या बाजूने ठाम उभा राहिल्याने सत्तेची सूत्रे पलटली.
प्रभारी मुख्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपने संख्याबळाच्या जोरावर विजयश्री खेचून आणला. महागाव नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदी शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे शाखा उर्फ प्रमोद भरवाडे यांची निवड झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवर नवे राजकीय समीकरण आकारास आल्याची चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान,जयश्री नरवाडे यांचे नाव चर्चेत असतांनाही पक्षाने शेवटच्या क्षणी रंजना आडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे अंतर्गत राजकारणाला वेग आला असल्याची चर्चा शहरात रंगली.
नगरपंचायतीच्या कार्यकाळास अवघे काही महिने शिल्लक असतांना भाजप समोर विकासकामांची गती वाढविण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे. उर्वरित कालावधीत ठोस कामगिरी झाली नाही,तर आगामी काळात थेट जनतेतून होणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीत त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागू शकतात,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एकूणच,१२विरुद्ध ५ अशा स्पष्ट मताधिक्याने झालेल्या या निवडीमुळे महागावच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व अधोरेखित झाले. काँग्रेस समोर नव्याने संघटन बांधणीचे आव्हान उभे ठाकले आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल निर्णायक मानला जात आहे.







