🔹प्रभारी अध्यक्ष म्हणून प्रमोद भरवडे यांच्याकडे कारभार
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.19 फेब्रुवारी) :-
मागील तीन वर्षात महागाव शहराची झालेली बकाल अवस्था शहरवासीयांनी अनुभवली आहे. शहरात विकासाचा प्रचंड बॅकलॉग निर्माण झाला असून पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी हाती असलेल्या नऊ महिन्याच्या सत्ता काळात महागाव शहरात वीस कोटी रुपयांची विकास कामे हमखास केली जातील अशी हमी भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी दिली. महागाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचा प्रभार आज उपाध्यक्ष प्रमोद उर्फ शाका भरवाडे यांनी हाती घेतला. याप्रसंगी आयोजित छोटेखानी स्वागत समारंभात नितीन भुतडा यांनी महागाव शहराला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्याचा शब्द दिला. डीपीडीसी, वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि शासनाच्या विविध योजनांमधून वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण बांधिल आहोत. नगरपंचायत मध्ये कायम मुख्याधिकारी, पुरेसे मनुष्यबळ आणि जनतेची कामे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी कार्यक्षम प्रशासन यासाठी प्राथमिकता राहील असे ते म्हणाले.
महागाव येथे पंचायत समितीची नवीन अद्ययावत इमारत उभी होत आहे. यासाठी पाच कोटीचा निधी मंजूर झाला असून आठवडाभरात भूमिपूजन सोहळा करण्यात येईल, तसेच नगरपंचायत कार्यालयासाठी स्वतंत्र अद्ययावत इमारत देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे भुतडा यांनी सांगितले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. विभागाचे आमदार किसनराव वानखेडे, ज्येष्ठ नेते रामराव पाटील नरवाडे, प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ शाका भरवाडे, नगरसेवक गजानन साबळे, परवेज सुरय्या, विशाल पांडे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दीपक आडे, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश नरवाडे, स्वीकृत नगरसेवक सुजित ठाकूर, शंकर बावणे, संजय विजय नरवाडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.







