🔸विचारवंत,भिक्खू संघ आणि नामवंत कलाकारांची मांदियाळी
🔹धम्म परिषदेत येतांना दोन्ही दिवस धमबांधवांनी शुभ्रवस्त्र परिधान करून येण्याचे आयोजका कडून आव्हान
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.18 फेब्रुवारी) :-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था महागावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १० व्या भव्य बौद्ध धम्म परिषदेचे बिगुल वाजले असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा ऐतिहासिक धम्म सोहळा संपन्न होणार आहे. होऊ घातलेल्या दहाव्या भव्य बौद्ध धम्म परिषदेची जयत तयारी चालू आहे. होऊ घातलेल्या धम्म परिषदेसाठी धम्म बांधवांनी दोन्ही दिवस शुभ्रवस्त्र परिधान करून येण्याचे आयोजका कडून आव्हान करण्यात आले.
देशपातळी वरील नामवंत विचारवंत, भिक्खू संघ,प्रबोधनकार तसेच सुप्रसिद्ध गायक-कलावंतांच्या उपस्थिती मुळे या वर्षीची धम परिषद विशेष ठरणार आहे.धम्म,समता, बंधुता आणि प्रबोधनाचा संदेश समाजमनात रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित दोन दिवसीय परिषदेतील धम्मचर्चा, धम्मदेसना हा मानव जातीला विचार,आचाराची प्रेरणा मिळणार आहे. धम्मपरिषदेत भीम-बुद्ध गीतांचा महासंग्राम हे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. शनिवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत धम्म ध्वजारोहण,शील ग्रहण व परिषदेचे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. धम्म ध्वजारोहण भदंत सुबोध स्थविर यांच्या हस्ते होणार आहे.
परिषदेचे उद्घाटन भदंत अश्वजित स्थविर हे करतील.मोर्शी, अमरावती येथील भदंत कौंडण्य स्थविर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या प्रसंगी हिंगोलीचे खासदार मा. नागेश पाटील आष्टीकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे अध्यक्ष मा. साहेबराव कांबळे आणि स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे (दराटीकर) धम्म बांधवांना यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.शनिवारी दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत भिक्खू संघाकडून धम्मदेशना होणार असून उपस्थितांना त्रिशरण, पंचशील आणि बुद्धांच्या धम्मतत्त्वांचे सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. समाजातील नैतिक मूल्यांची जपणूक, तरुणाईचे प्रबोधन आणि समतामूल्यांची जोपासना यावर विशेष भर दिला जाणार आहे.
शनिवारी रात्री ७ ते १० या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अजय दहाडे,अंजली गडपाले,निशाताई घोंगडे,भाग्यश्री इंगळे आणि वसंत आडे यांच्या आवाजात ‘भीम व बुद्ध गीतांचा महासंग्राम’ रंगणार आहे. समाजजागृतीची गीते आणि हे धम्मभावनेने ओतप्रोत सादरीकरणा मुळे हा कार्यक्रम धम्मप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.रविवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत शील ग्रहण व उपस्थित भिक्खू संघाकडून धम्मदेशना होईल. त्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्रात प्रा. डॉ. अनिल काळबांडे उमरखेड, ॲड. महादेव कांबळे सांगोला आणि आंतरराष्ट्रीय बाल प्रबोधनकार कुमारी प्रिया नप्ते आपले विचार मांडणार आहेत. भारतीय राज्यघटना, सामाजिक न्याय, बौद्ध तत्त्वज्ञान आणि आधुनिक काळातील धम्माची गरज या विषयांवर सखोल मार्गदर्शन होणार आहे.सायंकाळी ६ ते ७ या वेळेत समारोपीय कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडेल. रात्री ७ ते १० या वेळेत अशोक निकालजे मुंबई,भीमेश भारती नागपूर,संविधान मनोहर,मनोजराजा गोस्वामी आणि राजेश वाटोरे यांच्या गीतांनी धम्म परिषदेची भव्य सांगता होणार आहे.
या ऐतिहासिक धम्म सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आयोजक सागर दादा पाईकराव यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. परिसरात ठिकठिकाणी फलक, बॅनर आणि जनजागृती मोहिमा राबविण्यात येत असून धम्मप्रेमी अनुयायांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.महागाव व परिसरातील जास्तीत जास्त धम्मप्रेमींनी या परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले.







