✒️गुणवंत चटपकार चिमूर Chimur तालुका प्रतिनिधी)
चिमूर(दि.14 फेब्रुवारी) :-
भिसी नगरपंचायतीमध्ये एकूण १७ प्रभाग असून सर्वच प्रभागांमध्ये विविध मूलभूत समस्यांचा महापूर आला आहे. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका तथा काँग्रेस गटनेत्या सौ. मिना देवेंद्र मुंगले यांनी नगरपंचायत व शासनाकडे निवेदनाद्वारे विविध मागण्या मांडल्या आहेत.
नगरपंचायतीत सध्या उसनवार मुख्याधिकारी कार्यरत असून शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शहरालगत असलेल्या दोन राईस मिलमधून निघणारा धूर व बारीक कणांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने पर्यावरण व प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या मिल्स शहरापासून किमान ३ कि.मी. अंतरावर स्थलांतरित कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रशासकांच्या कार्यकाळात करण्यात आलेली कर्मचाऱ्यांची भरती नियमबाह्य असल्याचा आरोप करत ती रद्द करून नियमानुसार नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी मीना मुंगले यांनी केली आहे.
भिसी येथील बाजार ओट्या जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही त्यांनी मागणी केली आहे. शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ठोस आराखडा तयार करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच काही चौक व गल्ली-वसाहतींमध्ये पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन, रस्त्यांची दुरुस्ती व पथदिव्यांची व्यवस्था करण्यात यावी, असे निवेदन त्यांनी वरिष्ठ अधिकारी, मुख्याधिकारी, नगरविकास मंत्री व संबंधित विभागीय कार्यालयांना सादर केले आहे. भिसी नगरपंचायतीतील सर्व समस्यांच्या निराकरणासाठी आपण कटिबद्ध असून नागरिकांच्या प्रश्नांसाठी सक्षमपणे पाठपुरावा करू, असा विश्वास नगरसेविका तथा गटनेत्या मिना देवेंद्र मुंगले यांनी व्यक्त केला.







